

मुंबई : अंधेरी येथील जुहू चौपाटीवर साफसफाई करताना एका कंत्राटी कामगार महिलेचा बॉबकॅट बीच-क्लीनिंग मशीनखाली मृत्यू झाला. अंगम्मा देवेंद्र (वय ४५) असे या मयत महिलेचे नाव आहे. ती प्रतिष्ठान संस्थेची खासगी कामगार होती. तिला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी कूपर रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात आणल्यावर डाॅक्टरांनी तिला मृत म्हणून घोषित केले.
याप्रकरणी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असून चौकशी अहवालानंतर दोषीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
महापालिकेच्या एसडब्ल्यूएम विभाग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता नेहमी प्रमाणे जुहू चौपाटी येथे समुद्रकिनारा स्वच्छ करण्याच्या कामासाठी बॉबकॅट मशीनचा वापर केला जातो.
वाहन चालकाने तसे न करण्याची सूचना देऊनही, एक कंत्राटी महिला स्वच्छता कर्मचारी बॉबकॅट मशीनच्या बकेटमध्ये बसली. जेव्हा मशीन एका खड्ड्यात आदळली, तेव्हा त्या महिलेचा तोल गेला, ती बकेटमधून खाली पडली आणि मशीनखाली आली. यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.