Mumbai Model Extortion Case Pudhari
मुंबई

Mumbai Crime: मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात १.३९ कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल; व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा आरोप

Mumbai Model Extortion Case: मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून १ कोटी ३९ लाख रुपये उकळल्याच्या आरोपाखाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahul Shelke

Mumbai Model Extortion Case: मुंबईतील एका प्रसिद्ध मॉडेलविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात १ कोटी ३९ लाख रुपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप या मॉडेलवर करण्यात आला आहे. बदनामी करण्याची आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देऊन पैसे घेतल्याचा दावा तक्रारदार व्यावसायिकाने केला आहे.

तक्रारीनुसार, संबंधित मॉडेलने व्यावसायिकाकडून आलिशान फ्लॅट, एमजी हेक्टर कार, बंगळुरूमधील मालमत्ता आणि कार्यालयासाठी जागा मिळवली. याशिवाय विविध परदेश दौऱ्यांचा खर्चही व्यावसायिकाकडून करवून घेतल्याचा आरोप आहे. बँकॉक, व्हिएतनाम, जॉर्जिया आणि बाकू या ठिकाणच्या प्रवासासाठीही पैसे घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण लागले आहे. संबंधित मॉडेलने यापूर्वी व्यावसायिकाविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात पाठलाग करणे, मारहाण आणि बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत.

मात्र, हे गुन्हे आपल्यावर दबाव आणण्यासाठी दाखल करण्यात आल्याचा दावा व्यावसायिकाच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या आरोपांची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, संबंधित मॉडेलचे सोशल मीडियावर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या प्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. तपासातून या प्रकरणातील नेमके सत्य समोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT