Mumbai Missing Children 2025 Pudhari
मुंबई

Mumbai Missing Children 2025: मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी; हरवलेल्या 99 टक्के मुलांचा शोध

2025 मध्ये 2182 पैकी 2165 मुले पालकांच्या स्वाधीन; उर्वरित 17 अल्पवयीनांच्या शोधासाठी विशेष पथके सक्रिय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गतवर्षी मुंबई शहरातून हरवलेल्या 99 टक्के मुलांचा शोध लावण्यात मुंबई पोलिसांना यश आल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी शनिवारी दिली.

2025 साली शहरातून हरवलेल्या 2182 पैकी 2165 मुलांचा शोध लावून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यावर्षी आतापर्यंत मुंबई पोलिसांत पाच वर्षांपर्यंतच्या बेपत्ता मुलांची 7 प्रकरणे नोंद झाली असून या सर्वांना शोधून काढण्यात यश आले आहे.

सुलभ तपास करता यावा यासाठी पोलीस खात्याने बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांचे वयोमानानुसार पाच गट केले आहेत. 0 ते 5 वर्षे, 5 ते 10, 10 ते 14, 14 ते 16 व 16 ते 18 असे हे वयोगट आहेत. 2025 मध्ये 55 टक्के नोंदी बेपत्ता मुलांच्या होत्या, तर उर्वरित नोंदी मुलींच्या होत्या. 2026 मध्ये आतापर्यंत मुंबई शहरातून 178 अल्पवयीन बेपत्ता मुलांची नोंद झाली असून यापैकी 161 मुलांचा अर्थात 90 टक्के मुलांचा शोध लावण्यात यश आले आहे. 8 मुले व 9 मुली अशा एकूण 17 अल्पवयीन मुलांचा अद्याप शोध लागला नाही.

ही सर्व बेपत्ता मुले 16 ते 18 वयोगटातील आहेत. या सर्वांचा शोध घेण्यासाठी शहराच्या विविध भागांत पोलिसांची विशेष पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. एका प्रकरणात एक मूल घरातून तीन ते चार वेळा पळून गेले. पोलिसांनी प्रत्येकवेळी त्याचा शोध घेऊन परत आणले. प्रत्येकवेळी पोलिसांनी प्रकरणाची नोंद करुन त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

सध्या शहराच्या विविध भागांत तीन ते चार पथके कार्यरत आहेत. उर्वरित 17 मुलांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करणे हे या पथकांचे लक्ष्य आहे. काही बेपत्ता व अपहरण झालेल्या मुलांसंदर्भात सोशल मीडियावर चुकीची आकडेवारी तसेच अफवा प्रसारित करण्यात येत असल्याचे या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांनी म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT