Mumbai Voter Verification Pudhari
मुंबई

Mumbai Voter Verification: नोकरी मुंबईत; मतदार ओळख मात्र गावचीच!

गावाकडून फोनचा सपाटा; एसआयआरमुळे मुंबईतील चाकरमान्यांची धावपळ

पुढारी वृत्तसेवा

पवन होन्याळकर

मुंबई: रोजीरोटीसाठी मुंबईत स्थायिक झाले, मात्र तरीही मतदार म्हणून आपली ओळख गावाशीच कायम राहावी, ही भावना हजारो चाकरमान्यांच्या मनात जिवंत आहे. विशेष मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेमुळे ही भावना आता कृतीत उतरली असून गावच्या मतदार यादीत नावे कायम राहावीत यासाठी गावातील स्थानिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्या मदतीने मुंबईकरांशी संपर्क मोहीम सुरू केली आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुंबईतील चाकरमान्यांची धावपळ वाढली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग, कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड तसेच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिक वर्षानुवर्षे रोजगारासाठी मुंबईत वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांचे मतदानाचे हक्क आजही मूळ गावीच असल्याने प्रत्येक निवडणुकीत ही मंडळी गावच्या राजकारणातील महत्त्वाचा घटक ठरत असतात.

विधानसभा, लोकसभा किंवा ग्रामपंचायत निवडणूक असो, मतदानासाठी चाकरमान्यांना गावात आणण्यासाठी विशेष बस किंवा अन्य वाहनांची व्यवस्था करण्याची परंपरा आजही कायम आहे. अनेक गावांतील विजय-पराजयाची गणिते या मतदारांवरच अवलंबून असतात.

त्यामुळे कागदपत्रं लवकर पाठवा... नाहीतर नाव वगळले जाऊ शकते, अशा आशयाचे गावाकडून येणारे एकामागून एक फोन सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वरळी, डिलाईल रोड, कामोठे, खारघर, पनवेल, ऐरोली आणि घणसोली परिसरात राहणाऱ्या चाकरमान्यांच्या मोबाईलवर गावाकडून सातत्याने येत आहेत.

गावांमध्ये मुंबईत राहणाऱ्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार करून प्रत्येकाशी संपर्क साधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अर्ज गावात दिले आहेत, वेळेत भरून द्या , कागदपत्रे तातडीने पाठवा, उशीर होऊ देऊ नका, अशा सूचना सातत्याने गावाकडून मिळत असल्याने काही चाकरमान्यांनी आवश्यक कागदपत्रे नातेवाईकांकडे पाठविली आहेत, तर काहींनी प्रत्यक्ष गावाकडे जाण्याची तयारी सुरू केली आहे.

ग्रामस्थ मंडळांचाही पुढाकार

मुंबईतील लोअर परळ (डिलाईल रोड), वरळी, परळ, लालबाग परिसरात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांची ग्रामस्थ मंडळे कार्यरत आहेत. या मंडळांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जात असून, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शनही केले जात आहे.

गावच्या मतदार यादीत नावे कायम राहावीत, यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करण्याचे आवाहन आम्ही सर्वांना करत आहोत, असे आरदाळ ग्रामस्थ मंडळाचे सदस्य प्रवीण पावले, शिरसंगीचे आनंदा पताडे, सरोळीचे तानाजी पाटील, अशोक पंडीत यांनी सांगितले.

आमच्यापैकी अनेक जण रोजगारासाठी मुंबईत स्थायिक झाले असले, तरी मतदार म्हणून आमची ओळख अजूनही गावाशी जोडलेली आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे वेळेत देण्यासाठी ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून सर्वांशी संपर्क साधला जात आहे.
-विनोद पाटील सदस्य, महागोंड ग्रामस्थ मंडळ, मुंबई
चाकरमान्यांना ग्रामस्थ मंडळांच्या माध्यमातून बैठका घेऊन आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया व शंकांचे निरसन करण्याबाबत मार्गदर्शन करण्याचा विचार सुरू आहे.
-दीपक चव्हाण गणेशभक्त कोणवासीय प्रवासी संघ, मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT