

अनुपमा गुंडे
ठाणे: खाद्य पदार्थाचा दर्जा चांगला नाही, भेसळ आहे, हॉटेल मध्ये स्वच्छता नाही. किराणा मालातील वस्तूंची एक्सापयरी डेट संपलेली आहे...जून महिन्यात अन्न प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर राज्यभरातून अशा सुमारे अडीच हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत.
जाग्या झालेल्या ग्राहक राजाच्या सतर्कतेमुळे तक्रार करणे आधिक सोपे व्हावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने विकसित केले आहे. खाद्य पदार्थ, दुध, विविध प्रकारची पेये याशिवाय कच्च्या मालापासून अन्न पदार्थांच्या निर्मितीवर प्रक्रिया नजर ठेवून ग्राहकांना सकस दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न प्रशासन कार्यरत आहे.
तर मेडिकलमध्ये कार्यरत असलेल्या केमिस्ट प्रशिक्षित आहेत की नाही आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणती औषधे देवू नयेत, अशा अनेक नियम आणि कायद्याच्या अख्त्यारित अन्न आणि औषध प्रशासन बांधलेले आहे. मात्र मनुष्यबळाच्याकमतरतेने कायमच ग्रासलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार गेल्या काही काळापासून थंड झाला होता.
मात्र मे महिन्यात प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाची समस्त यंत्रणा कामाला लागली आणि धडाकेबाज कारवायांचा सिलसिला सुरू झाल्याने ग्राहकांनाही आपल्या तक्रारीची दखल घेतली जाईल अशी आशा वाटू लागली.
त्यामुळे विशेषतः अन्न प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकाशिवाय, ई मेल आणि आपले सरकार या सरकारी संकेतस्थळावर जुन महिन्यात २ हजार ५३२ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
चुकीच्या पध्दतीने औषधांची विक्री
औषध प्रशासनाच्या संदर्भात रूग्णालयात भरती केले जात नाही, गैरसोय होते. फार्मासिस्ट नसते. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिले जाते. रूग्णालयाच्या मेडिकलमधून औषध घेण्याची सक्ती अशा तक्रारी येतात.
मेडिकलमध्ये चुकीच्या पध्दतीने औषधांची विक्री केली जात आहे. सौंदर्यप्रसाधनाचा दर्जा आणि केल्या जाणार्या दाव्याबाबत जुजबी तक्रारी या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी दाखल केल्या जातात.
तक्रारीचे स्वरूप काय आहे ?
अन्न प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर अन्न पदार्थांचा दर्जा, मुदतबाह्य पदार्थांची विक्रीच्या १.३०२ तक्रारी, गुटखा विक्रीच्या ५८९, दारूच्या दुकानाच्या संदर्भातील १३३ दाखल झाल्या आहेत. याशिवाय ४५१ तक्रारींमध्ये ग्राहकांनी केलेल्या तक्रारीमध्ये भेसळीच्या संदर्भात वरवरची माहिती किंवा तक्रारीचे तपशील दिले नाहीत.