

मुंबई: स्वतःला दैवी शक्ती लाभल्याचा दावा करून भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नाशिकच्या स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक एकनाथ खरात उर्फ 'कॅप्टन' यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात तब्बल ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, त्यात ४२.८८ कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगचा आरोप करण्यात आला आहे.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अशोक खरात यांच्यासह त्यांची पत्नी कल्पना खरात आणि अन्य तीन जणांना आरोपी करण्यात आले आहे. तपासादरम्यान नोंदविण्यात आलेल्या ३७ साक्षीदारांचे जबाब, विविध बँक व्यवहारांची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांचे तपशील आणि अन्य दस्तऐवजी पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.
ईडीच्या तपासानुसार, अशोक खरात यांनी मंत्र-तंत्र, अघोरी उपचार आणि दैवी शक्तींचे आमिष दाखवून अनेक भक्तांकडून कोट्यवधी रुपये उकळले. या पैशांचा स्रोत लपविण्यासाठी विविध व्यक्तींच्या खात्यांचा वापर करून व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. तपासात १४२ बनावट किंवा प्रॉक्सी बँक खात्यांचा वापर झाल्याचेही निष्पन्न झाल्याचा दावा ईडीने केला आहे.
या प्रकरणात ईडीने यापूर्वीच अशोक खरात यांना अटक केली होती. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यासह विविध ठिकाणी दाखल झालेल्या फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंगचा तपास सुरू केला होता.
या मूळ गुन्ह्यांतून मिळालेल्या रकमेचे आर्थिक व्यवहारांद्वारे शुद्धीकरण (मनी लाँडरिंग) करण्यात आल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे. दरम्यान, ईडीने यापूर्वी या प्रकरणात सुमारे १९.२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. आता आरोपपत्र दाखल झाल्याने सुनावणीला वेग येण्याची शक्यता आहे.