Hinjewadi Shivajinagar Metro Pudhari
मुंबई

Mumbai Metro Passenger Record: बेस्टच्या संपामुळे साडेतीन लाख प्रवाशांचा मेट्रोने प्रवास

मेट्रो २ अ, ७, ९ मार्गिकांवर शुक्रवारी नोंदवली गेली आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन प्रवासीसंख्या

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बेस्टचा संप सुरू झाला खरा पण यामुळे मुंबईच्या मेट्रो मार्गिकांना मात्र मोठा लाभ मिळत आहे. मेट्रो २ अ, ७ आणि ९ या मार्गिकांवर एकत्रित सर्वाधिक प्रवासीसंख्या शुक्रवारी नोंदवली गेली. या दिवशी ३ लाख ५७ हजार ८९५ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन प्रवासीसंख्या आहे.

अंधेरी पश्चिम ते दहिसरपर्यंत मेट्रो २ अ मार्गिका, गुंदवली ते दहिसरर्यंत मेट्रो ७ मार्गिका चालवली जाते. मेट्रो ७ मार्गिकेचा अलीकडेच काशिगावपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. गुरुवारी या सर्व मेट्रो मार्गिकांची संध्याकाळी ७ वाजेपर्यंतची प्रवासीसंख्या २ लाख ३४ हजार ५९३ होती.

शुक्रवारी बेस्टचा संप असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवासी मेट्रोकडे वळले. त्यामुळे संध्याकाळी ७ वाजेपर्यंत २ लाख ४८ हजार ४५३ प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला. शुक्रवारी दिवसअखेरीस मेट्रोची प्रवासीसंख्या ३ लाख ५७ हजार ८९५पर्यंत गेली.

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ ही संयुक्त मेट्रो मार्गिका २०२१-२२ साली सुरू झाली. त्यानंतर ६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रथमच दैनंदिन प्रवासी संख्या २ लाख ६९ हजार २३० वर पोहोचली होती. त्यानंतर १३ ऑगस्ट २०२४ रोजी २ लाख ७८ हजार ४४३ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.

३ सप्टेंबर २०२४ रोजी २ लाख ७९ हजार ७१७ जणांनी मेट्रोने प्रवास केला. ५ सप्टेंबर २०२४ रोजी २ लाख ८१ हजार २४९ आणि ७ ऑक्टोबर २०२४ रोजी २ लाख ९२ हजार ५७५ इतकी दैनंदिन प्रवासी संख्या होती.

गतवर्षीची सर्वाधिक मोठी प्रवासी संख्या १८ जूनची आहे. या दिवशी २ लाख ९४ हजार ६८१ प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला होता. केवळ आठवड्याभरात यात ३ हजारांची वाढ झाली होती. त्यानंतर २१ ऑगस्टला ३ लाख ३४ हजार ७६६ प्रवाशांनी प्रवास केला. एक महिना पूर्ण होण्याच्या आधीच त्यात वाढ झाली व १६ सप्टेंबरला ३ लाख ४० हजार ५७१ प्रवाशांनी या मार्गिकेवरून प्रवास केला. १५ ऑक्टोबरला २०२५ रोजी या मार्गिकेवरून ३ लाख ४४ हजार ३११ प्रवाशांनी प्रवास केला होता.

भुयारी मेट्रोलाही फायदा

बेस्टच्या संपाचा फायदा आरे ते कफ परेड भुयारी मेट्रोलाही झाला. गेल्या शुक्रवारी राबवण्यात आलेल्या सार्वजनिक वाहतूक दिनी भुयारी मेट्रोला फारसे महत्त्व मिळाले नव्हते. या दिवशी केवळ १ लाख ४४ हजार २९१ प्रवाशांनी प्रवास केला होता. १८ जूनला १ लाख ५१ हजार ५०२ प्रवाशांनी प्रवास केला. शुक्रवारी बेस्टचा संप असल्याने १ लाख ८१ हजार ७१६ प्रवाशांनी भुयारी मेट्रोने प्रवास केला. म्हणजेच ३० हजार २१४ अतिरिक्त प्रवासी मेट्रोला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT