मुंबई: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महा मुंबई मेट्रोच्या मेट्रो मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ वर तंत्रज्ञानाधारित पावसाळी सज्जता आराखडा कार्यान्वित केला आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही मेट्रोसेवा सुरक्षित आणि अखंडित राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यावर्षी मेट्रो मार्गिका २ब आणि ९ या मार्गिका सुरू झाल्यानंतरचा हा पहिलाच पावसाळा आहे. त्यामुळे महा मुंबई मेट्रोला चार मार्गिकांची विशेष तयारी करण्याचे आदेश एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांनी दिले आहेत.
मेट्रो स्थानके, डेपो, व्हायाडक्ट आणि संबंधित मेट्रो पायाभूत सुविधांवर प्रवासी सुरक्षा, पाणी साचण्याची समस्या, आपत्कालीन प्रतिसाद, पायाभूत संरक्षण आणि विविध यंत्रणांशी समन्वय यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
मान्सून कृती आराखड्याअंतर्गत मेट्रो मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ वर एकूण २,४९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्यापक देखरेख जाळे तयार करण्यात आले आहे. पाणी साचण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणी ३० आपत्कालीन पंप तैनात करण्यात आले आहेत.
स्थानके, डेपो आणि व्हायाडक्टवरील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची गाळ, झाडेझुडपे आणि अडथळे दूर करून साफसफाई करण्यात आली आहे. पावसाचे पाणी साचू नये, यासाठी कार्यरत उन्नत मार्गाची साफसफाईही पूर्ण करण्यात आली आहे.
मेट्रो नेटवर्कवरील १,०७० इन्सुलेटरची प्रतिबंधात्मक तपासणी आणि देखभाल पूर्ण करण्यात आली आहे. तसेच २५ केव्ही केबल्स, पँटोग्राफ, करंट ट्रान्सफॉर्मर्स, ट्रान्सफॉर्मर्स, आणि लाइटनिंग अरेस्टर्स (वीज चमकल्यावर नुकसान टाळण्यासाठी) यांची तपासणी व देखभाल करण्यात आली आहे. ट्रॅक्शन सब-स्टेशन्ससाठी पूर संरक्षण उपाययोजनाही अधिक बळकट करण्यात आल्या आहेत.
रिअल-टाइम हवामान निरीक्षणासाठी १४ महत्त्वाच्या स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजणारी अनिमोमीटर यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो मार्गिका २अ वरील दहिसर पूर्व, डहाणूकरवाडी, वळणई, गोरेगाव पश्चिम आणि अंधेरी पश्चिम; मेट्रो मार्गिका ७ वरील राष्ट्रीय उद्यान, पोईसर, आरे, जोगेश्वरी पूर्व आणि गुंदवली; तसेच मेट्रो मार्गिका २ब आणि ९ वरील मानखुर्द, शिवाजी चौक, दहिसर आणि काशीगाव या स्थानकांचा समावेश आहे.
स्थानकांवर छतामधून पाणी गळती, प्लॅटफॉर्मवरील पाणी निचरा आणि पाणी अडकण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अर्थिंग स्थानकांवर अर्थ रेसिस्टन्स मोजणी, उपकरणांची स्थिती तपासणी आणि नियमित देखभाल पूर्ण करण्यात आली आहे.
एआय आधारित तंत्रज्ञान
पारंपरिक पावसाळी तयारीसोबतच एमएमआरडीएने मेट्रो संचालनात प्रगत तंत्रज्ञान आणि एआय-आधारित यंत्रणांचा वापर सुरू केला आहे. यामुळे सुरक्षा, पूर्वानुमानाधारित देखभाल, संचालनात कार्यक्षमता, महसूल व्यवस्थापन आणि प्रवासी अनुभव अधिक सक्षम होणार आहे.
मेट्रो मार्गिका २अ आणि ७ वर कार्यान्वित केलेल्या एआय-सक्षम ऑटोमेटेड पॅन्टोग्राफ कंडिशन मॉनिटरिंग सिस्टममध्ये हाय-स्पीड कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून धावत्या गाड्यांवरील पॅन्टोग्राफची रिअल-टाइम तपासणी केली जाते. त्यामुळे तांत्रिक बिघाड लवकर ओळखणे आणि पूर्वानुमानाधारित देखभाल करणे शक्य होते. यापूर्वी सुमारे ३० मिनिटे लागणारी तपासणी आता काही सेकंदांत पूर्ण होते. त्यामुळे गाड्यांची उपलब्धता आणि प्रवासी सुरक्षा वाढते.
आपत्कालीन राखीव मेट्रो
अनपेक्षित परिस्थितीसाठी राखीव मेट्रो गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. मुख्य मार्गिकेवर तीन राखीव मेट्रो आणि डेपोमध्ये दोन मेट्रो ठेवण्यात आल्या असून, अशा पाच राखीव मेट्रो गाड्या उपलब्ध राहतील. अतिवृष्टीसारख्या परिस्थितीत सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी यंत्रणाही तयार ठेवली आहे. आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला साधनसामग्री पोहोचविण्यासाठी विशेष मेट्रो डब्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे