मुंबई : डिसेंबरअखेर दहिसर ते काशिमिरा मार्गावर मेट्रो सुरू होणार आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर ते काशिमिरा या मेट्रो मार्गाची गुरुवारी पाहणी केली तेव्हा त्यांच्यासोबत ‘महामेट्रो’चे अधीक्षक अभियंता व त्यांची तंत्रज्ञ सल्लागार कंत्राटदार टीम उपस्थित होती.
2014 साली या मेट्रो 9 प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. सध्या या प्रकल्पाच्या दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. सीएमआरएस चाचणीही सुरू झाली आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर डिसेंबरअखेरीस मेट्रो सुरू करता येईल.
ही मेट्रो 9 मेट्रो 7 सोबत जोडली जाणार असून, यामुळे मिरा-भाईंदर येथून थेट गुंदवलीपर्यंत प्रवास करता येणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर पुढील वर्षी डिसेंबरमध्ये दुसरा टप्पा सुरू केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ही मेट्रो मार्गिका नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होईल.
वसई - विरार मेट्रो मार्गिकेचे कामदेखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई - विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक गाठता येईल, असे सरनाईक यांनी सांगितले.