

मुंबई: मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक शुक्रवारीही सरासरी 165 राहिला. त्यामुळे मुंबईकर गुलाबी थंडी अनुभवत असताना वाढत्या वायू प्रदूषणामुळे आजारी पडू लागले आहेत. शहर आणि उपनगरांमधील हवा आरोग्यास हानिकारक ठरत आहे.
हवेतील प्रदूषण वाढल्याने श्वसनाचा त्रास, खोकला, अॅलर्जी आणि डोळ्यांची जळजळ आदी समस्या मुंबईकरांना जाणवू लागल्या आहेत. मुंबईतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 165 ते 170 इतका आहे. पश्चिम उपनगरांमध्ये वाढते वायू प्रदूषण आहे. सर्वाधिक प्रदूषण मालाडमध्ये (एक्यूआय 175) आहे. त्या खालोखाल पूर्व उपनगरांतील देवनारचा (172) क्रमांक लागतो. पश्चिम उपनगरांत कांदिवली (170), वांद्रे-कुर्ला संकुल-बीकेसी, बोरिवली (एक्यूआय 167) तसेच पवई (163) भागांतही वायू प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. 150 ते 200 मधील एक्यूआयचे प्रमाण म्हणजे हवा आरोग्यास घातक,अशी प्रदूषणाची पातळी मोजली जाते.
मुंबईत सुरू असलेल्या इमारती, रस्ते, पूल आणि मेट्रोंच्या कामांमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वांद्रे (पूर्व) आणि विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर भागात मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत आहे. धुळीचे साम्राज्य पाहता अनेक जण मास्क घालून घराबाहेर पडत आहेत.
आवश्यक उपाययोजना
बांधकाम किंवा तोडकाम सुरू असणारी जागा हिरव्या कापडाने झाकलेली असावी.
35 फूट उंच किंवा 70 मीटर परिसरात पसरलेल्या प्रकल्पाला धातूच्या पत्र्यांचे कुंपण असावे.
तोडकाम सुरू असणार्या ठिकाणी पाण्याची फवारणी करावी.
धूळ शोषून घेणार्या यंत्रांचा वापर करावा.