मुंबई : मेट्रो 3 भुयारी मार्गिकेचा अखेरचा टप्पा बुधवारी सुरू झाला असला तरी मेट्रो 2 ब मार्गिकेवरील प्रवाशांची मात्र निराशा झाली आहे. सीएमआरएसची तपासणी झाली असून प्रमाणपत्र न मिळाल्याने बुधवारी या सेवेचे लोकार्पण होऊ शकले नाही.
त्यामुळे आता दिवाळीनंतरच ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज सहा डब्यांची मेट्रो या मार्गिकेवर धावणार आहे. या मेट्रोची पहिली चाचणी 15 एप्रिलला करण्यात आली होती. पहिला टप्पा जून 2025 पर्यंत तर दुसरा टप्पा डिसेंबर 2025पर्यंत सुरू करण्याचे नियोजन होते. सप्टेंबर संपला तरीही या मार्गिकेवर मेट्रो धावू शकलेली नाही.
2 ते 4 जुलै दरम्यान सीएमआरएसने प्राथमिक तपासणी केली होती. त्यांनी मेट्रोच्या कामासंदर्भात काही सूचना केल्या होत्या. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर सीएमआरएसकडून अंतिम चाचणी करण्यात आली. मात्र, अद्याप प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही.
ही मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग मेट्रो मार्गाने जोडले जातील. तसेच पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मेट्रो 1, मेट्रो 2 अ, मेट्रो 3, मेट्रो 4 अशा विविध ठिकाणांना जोडणी मिळेल. नव्या मेट्रो मार्गिकेमुळे पूर्व व पश्चिम उपनगरे जोडली जातील. ही मार्गिका सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी कमी होणार आहे.
मेट्रो 2 ब ही 23.64 किमीची मार्गिका असून यावर 20 स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात कुर्ला पूर्व, पूर्व द्रुतगती मार्ग, चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल, मानखुर्द व मंडाळे डेपो अशी सेवा असणार आहे.