Eknath Shinde (Pudhari Photo)
मुंबई

Mumbai Mayor Election: महापौरपदासाठी मित्रपक्षांत रस्सीखेच; मुंबईसह तीन महापालिकांत सत्ता-समीकरणे तापली

भाजप-शिवसेना युतीत तणाव, ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महापालिकेच्या निकालानंतर मुंबईसह कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिकेत मित्रपक्ष भाजप- शिवसेना युतीमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबईत भाजपपेक्षा कमी जागा जिंकल्या असल्या तरी आपल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणे अशक्य असल्याने शिंदेंच्या शिवसेनेकडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी करण्यात आली आहे. दगाफटका नको म्हणून शिंदेंनी आपले नगरसेवक ताज लँड्‌‍स या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहेत. तसेच उद्धव आणि राज ठाकरे यांचे नगरसेवक गळाला लावून आपली ताकद वाढविण्याचे प्रयत्नदेखील एकनाथ शिंदेंनी ‌‘ऑपरेशन टायगर‌’च्या माध्यमातून सुरू केल्याची चर्चा आहे. दरम्यान, महापौर निवडीसाठी आरक्षण सोडतीनंतरच वेग येण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेत बहुमतासाठी 114 जागांची आवश्यकता असताना भाजपला 89 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपला 25 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. आपल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणे अवघड असल्याने एकनाथ शिंदेंनी भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी मुंबईतील सर्व नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये हलविले आहेत. त्यावेळी शिंदेंनी ‌‘ऑपरेशन टायगर‌’ हाती घेतल्याची चर्चा आहे. शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक गळाला लावून मुंबई महापालिकेत आपली ताकद वाढविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांचे नगरसेवक वाढले तर त्यांचा अडीच वर्षांसाठी महापौर पदाची मागणीला अधिक बळ मिळणार आहे.

122 सदस्य संख्या असलेल्या कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला 53 तर भाजपला 51 नगरसेवक निवडून आणता आले आहेत. बहुमतासाठी आवश्यक असलेला 62 चा आकडा दोघांकडेही नाही. त्यामुळे तेथेही मनसेच्या 5 आणि उद्धव ठाकरेंच्या 12 नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तर 78 सदस्य संख्या असलेल्या उल्हासनगर महापालिकेत भाजपला 37, तर शिवसेनेला 36 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे तेथेही दोघा मित्रपक्षांमध्ये महापौरपदासाठी चुरस आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तीन महापालिकांमध्ये सत्तावाटपाचे सूत्र ठरू शकते. प्रसंगी मुंबई महापालिकेत महापौरपद मिळाले नाहीच, तर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौरपद आणि महत्त्वाचे असलेले मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती मिळविण्याचा शिंदेंचा प्रयत्न असू शकतो.

प्रशिक्षणासाठी शिवसेना नगरसेवक हॉटेलमध्ये : शीतल म्हात्रे

आमचे जवळपास 20 नगरसेवक हे नवखे आहेत. त्यांना महापालिका कामकाज माहीत नाही. त्यामुळे आम्ही नगरसेवकांसाठी दोनदिवसीय प्रशिक्षण शिबीर घेतले आहे, त्यासाठी हे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत, असा खुलासा शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आम्ही महायुती म्हणून लढलो आणि जिंकलो आहोत, पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही. लोकांनी कौल दिला आहे तो महायुती म्हणून दिला. महायुती म्हणूनच सत्तेत येणार, असेही त्या म्हणाल्या.

हे सगळेजण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवकांना हरवून आले आहेत. भाजपशी महायुती ही बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली नैसर्गिक युती आहे. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीचा हा विषय नाही. तसेच महापौरपदाचा निर्णय महायुतीचे नेते घेतील. आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करायची कुठलीही गरज नाही. जे लोक पुड्या सोडत आहेत, त्यांचेच नगरसेवक इकडे तिकडे फिरत नाहीत ना, याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असा इशाराही म्हात्रे यांनी दिला.

महापौर आकाशातून येणार आहे का?

देवाच्या मनात आले तर शिवसेनेचा महापौर होईल, अशी आशा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यावर टीका करताना भाजप नेते नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहायला लागले का? देवासमोर कधी हात जोडले नाहीत. मग आकाशातून महापौर येईल का? संख्या बघा जरा. एवढा फरक कसा काय भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे सध्या नैराश्येत गेले आहेत. महाराष्ट्रात भाजपची 25 महापालिकेत सत्ता आली, आता तरी शहाणे बना ना आणि घरी बसा, असा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

भाजपचे नगरसेवक निर्धास्त का?

महापौरपदाबाबत, विशेषतः मुंबईबाबत राजकीय विधाने सुरू आहेत. शिंदे गटाने आपले नगरसेवक पंचतारांकित हाँटेलात ठेवले आहेत, तर देवाच्या मनात असेल तर आपलाही महापौर होऊ शकतो, अशी भूमिका स्वतः उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. मात्र भाजपला धक्का देण्याची कोणतीही राजकीय खेळी झाल्यास भाजप नेतृत्वाकडून त्याची पुरती परतफेड केली जाईल. कोणताही दगाफटका सहन करण्याच्या मन:स्थितीत भाजप नेतृत्व नाही. शिवाय गटनोंदणीनंतर पक्षांतर बंदीच्या कारवाईची सारी सूत्रे प्रशासनाच्या हाती जाणार आहेत. राज्यांच्या प्रमुखांना डावलून कोणतेही राजकीय धाडस अंगलट येण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळेच इतर पक्षांचे नगरसेवक हॉटेलात असले तरी भाजपचे नगरसेवक मात्र निर्धास्त असल्याकडेही भाजपच्या वरिष्ठ नेत्याने लक्ष वेधले.

ताज लँड्‌‍समधील नगरसेवक आमच्या संपर्कात : संजय राऊत

उबाठा शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी ‌‘सर्वांनी ठरविले तर मुंबईत भाजपचा महापौर होणार नाही‌’, असा दावा करतानाच ताज लँड्‌‍समध्ये ठेवलेले एकनाथ शिंदेंचे नगरसेवक एकेकाळचे आमचे सहकारी असल्याने ते संपर्कात असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याने राऊत यांनी त्यांच्यावर टीकाही केली. ज्यांनी स्वतः शिवसेनेचे आमदार फोडले त्यांना आता नगरसेवक फुटतील अशी भीती वाटत असेल तर आश्चर्याची गोष्ट आहे. जिथे मुख्यमंत्री भाजपचे आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तरीही त्यांना आपले नगरसेवक फोडले जातील, पळवले जातील, अशी भीती वाटत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही हास्यजत्रा आहे, असे राऊत म्हणाले. नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे आहेत. त्यांच्या मनातही मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल धगधगते आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवले आहे, असेही राऊत म्हणाले. कुणी कितीही कोंडून ठेवले तरीही इतकी साधने असतात संपर्काची, दळणवळणाची. त्यानुसार संदेश येत असतात. मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचा किंवा शिवसेनेचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये, अशी एकनाथ शिंदेंसह सर्वांनी इच्छा आहे, असा दावा राऊत यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT