Devendra Fadnvis (Pudhari File Photo)
मुंबई

Mumbai Mayor Decision: मुंबई महापौरपदावरून वाद नको; दावोसहून मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत

महायुती भक्कम, मुंबईत परतल्यानंतर महापौरपदाचा निर्णय; अफवांवर मुख्यमंत्र्यांचा फुलस्टॉप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून सुरू असलेली रस्सीखेच आणि वादंगावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथून भाष्य केले आहे. जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला असून, महापौरपदासह इतर छोट्यामोठ्या पदांवरून वाद आणि भांडण जनतेला रुचणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्याचवेळी महायुती भक्कम असून, मुंबईत परतल्यानंतर महापौरपदाबाबत निर्णय केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस हे दावोसला रवाना झाले होते. महापालिका निकालांत विशेषतः मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, निकालानंतर शिंदे गटाच्या विजयी नगरसेवकांचा मुक्काम मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये हलविण्यात आला. त्यामुळे महापौरपदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दावोस येथे अर्थविषयक संकेतस्थळाशी बातचीत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत भाष्य केले.

शिंदे गटाने अडीच वर्षांसाठी महापौरपद मागितल्याच्या चर्चांबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, या सर्व चर्चा केवळ अफवा आहेत. आमच्यासमोर कोणतीही अडचण अथवा वाद नाही. महायुतीने मुंबईत एकत्रितपणे निवडणुका लढविल्या आहेत. दावोस येथील परिषदेनंतर जेव्हा मुंबईत परतेन तेव्हा आम्ही एकत्र बसून महापौरपदाबाबत निर्णय करू, याबाबत मला खात्री आहे. कोण महापौर होणार किंवा कोणाला कोणते पद मिळणार नाही, अशा विषयात महायुतीत कोणताही संघर्ष अथवा वाद नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाकरे आणि तुमच्यात चर्चा सुरू झाल्या आहेत का, या प्रश्नावर या सर्व वावड्या आणि अफवा आहेत. ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आमची महायुती भक्कम आहे. महापौरपद किंवा इतर छोट्यामोठ्या पदांसाठी भांडत बसणार नाही. जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आहे. असा जनादेश मिळाल्यानंतर पदांसाठी भांडत बसणे योग्य नाही, लोकांना ते आवडणार नाही. त्यामुळे आम्ही ते करणारही नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीत जनतेने भाजप आणि महायुतीला मोठे यश दिले. या विजयानंतर ट्रिपल इंजिन आल्याचे बोलले जात आहे. यावर, ट्रिपल इंजिनसोबत ट्रिपल जबाबदारी वाढल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखविली. जनतेचा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. स्वच्छ, पारदर्शक आणि कार्यक्षम कारभारातून हा विश्वास सार्थ करणार असल्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT