मुंबई: राणीच्या बागेतील महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी काही आठवड्यांपूर्वीच 75 लाख रुपये खर्च करण्यात आले असताना, आता त्याच ठिकाणी तब्बल 3.40 कोटी रुपयांच्या नव्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप होत असून मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘अलिफिया पन्ना कन्स्ट्रक्शन’ या कंत्राटदारामार्फत 2 जानेवारी 2026 पासून बंगल्याच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली होती. यामध्ये रंगकाम, सोफा वर्क, बाथरूम दुरुस्ती तसेच इलेक्ट्रिकल फिटिंग्ज अशा विविध कामांचा समावेश होता. संबंधित कामांवर सुमारे 75 लाख रुपये खर्च करण्यात आले असून ती कामे पूर्ण झाल्याचे कंत्राटदाराने महापालिकेला सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मात्र, 16 फेब्रुवारी रोजी महापौरांच्या भेटीनंतर बंगल्यात आणखी बदलांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा 3.40 कोटी रुपयांच्या नव्या कामांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अवघ्या महिनाभरापूर्वी पूर्ण झालेली कामे इतक्या लवकर निकृष्ट कशी ठरली, असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर टीका होत आहे. एका बंगल्याच्या दुरुस्तीवर काही महिन्यांतच चार कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाणे म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
शहरातील नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असताना सत्ताधाऱ्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याने पालिकेच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.