Mumbai Mayor Bungalow Renovation Pudhari
मुंबई

Mumbai Mayor Bungalow Renovation: डागडुजीनंतरच महापौरांचा बंगल्यात प्रवेश; 5 कोटींच्या नूतनीकरणावरून चर्चा

राणीबागेतील महापौर निवासासाठी अंतर्गत सजावट, फर्निचर आणि सुशोभीकरणाचा मोठा खर्च

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : 11 फेब्रुवारी रोजी भाजपच्या रितू तावडे यांनी मुंबईच्या महापौरपदाचा पदभार स्वीकारला असला तरी त्या अद्याप महापौर बंगल्यात राहण्यास गेलेल्या नाहीत. डागडुजीनंतरच त्या बंगल्यात जाणार असून त्यावर सुमारे 5 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीबाग) येथे महापौरांचा बंगला आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून महापौरांच्या सूचनेनुसार अंतर्गत सजावट व फर्निचर करण्यात येणार असल्याचे समजते. रितू तावडे यांनी बंगल्यात न जाता स्वतःला अपेक्षित असलेल्या बंगल्याच्या नूतनीकरणाची मागणी केली आहे.

त्यानुसार अधिकाऱ्यांनी महापौरांशी चर्चा करून बंगल्यातील अंतर्गत बदल, फर्निचर, आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली असून लवकरच स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर होणार आहे. त्यानंतर बंगल्याच्या कामाला किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

2019 मध्ये झाली होती डागडुजी

शिवाजी पार्क येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्यानंतर तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासाठी राणीबागेतील बंगला उपलब्ध करून देण्यात आला. त्यावेळी बंगल्याची डागडुजी करण्यात आली होती. मुंबई महापालिका विसर्जित झाल्यानंतर तब्बल चार वर्षे बंगल्यामध्ये कोणाचेच वास्तव्य नव्हते. त्यामुळे बंगल्यात अनेक ठिकाणी पडझड झाली असून भिंतीही काळवंडल्या आहेत. फर्निचरही जुने झाले आहे. त्यामुळे डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT