Mumbai Mayor Bungalow Rani Baug Pudhari
मुंबई

Mumbai Mayor Bungalow Rani Baug: राणीबागेतील महापौर बंगला नव्या महापौर रितू तावडे यांच्या स्वागतासाठी सज्ज

भाजपाच्या पहिल्या महापौरांचा अडीच वर्षांचा निवास; 1931 सालचा ऐतिहासिक हेरिटेज बंगला पुन्हा चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राजेश सावंत

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील (राणीबाग) महापौर बंगला नव्या महापौरांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. या बंगल्यात आपला संसार थाटणाऱ्या यादीमध्ये रितू तावडे या तिसऱ्या महापौर असून भाजपाच्या पहिल्याच महापौर ठरणार आहेत. त्यामुळे नवे महापौर शुभ मुहूर्त ठरवून गृहप्रवेश करणार आहेत.

मुंबई महापौरांच्या निवासस्थानासाठी पूर्वी शिवाजी पार्क समुद्रकिनाऱ्यालगत आलिशान व हेरिटेज बंगला होता. या बंगल्याची अनेकांना क्रेझ होती. आवर्जून या बंगल्याची भेट घेण्यासाठी पर्यटकही रेंगाळत. मात्र हा बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला देण्यात आल्याने महापौरांसाठी राणी बागेतील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला देण्यात आला. या बंगल्यात पहिल्यांदा दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रवेश केला. त्यानंतर या बंगल्यात किशोरी पेडणेकर यांचे वास्तव्य होते. आता या बंगल्यात भाजपाच्या पहिल्या महापौर रितू तावडे येणारी अडीच वर्षे आपला संसार थाटणार आहेत.

नव्या महापौरांच्या स्वागतासाठी हा बंगला सज्ज झाला असून महापौरांच्या दिमतीला कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. महापौरांसाठी अगदी इस्त्रीवाल्यासह जेवण करणारा खानसामा, महापौरांची सेवा करण्यासाठी महिला कर्मचारी वर्ग व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय सुरक्षा रक्षकही या ठिकाणी 24 तास तैनात राहणार आहेत.

महापौर बंगल्याची 1931 मध्ये निर्मिती

राणीबागेतील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या महापौर बंगल्याची 1931 मध्ये निर्मिती झाली. सुमारे 6 हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा प्रशस्त बंगला असून जो सुरुवातीला ब्रिटिशांचा कॅफेटेरिया होता. 1974 पासून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेला हा हेरिटेज बंगला शिवाजी पार्क येथील निवासात बाळासाहेब ठाकरे स्मारक ठरल्यानंतर, 2019 मध्ये तात्पुरते महापौर निवास म्हणून उपयोगात आणण्यात आला.

महापौरांच्या बंगल्यात पाहुण्यांना बसण्यासाठी प्रशस्त सभागृह, महापौराना स्वतंत्र व प्रशस्त बेडरूम, सहकुटुंबासाठी बेडरूम, स्वयंपाक घर, विविध बैठकांसाठी सभागृह, अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा, बंगल्याच्या सभोवती विविध प्रकारची झाडे-फुलझाडे, हिरवळीची लागवड, महापौरांना फेरफटका मारण्यासाठी प्रशस्त जागा, वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था व अन्य सुविधा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT