Mumbai Mayor gatekeeper pudhari photo
मुंबई

Mumbai municipal history : महापौरांसोबत सावलीसारखे वावरणारे द्वारपाल झाले इतिहासजमा

१९३१ सालापासून सुरू असलेली राजशिष्‍टाचाराची परंपरा २००९ मध्ये मुख्य जमादारावरील पोशाख उतरवून खंडीत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राजेश सावंत

मुंबईच्या महापौरांना ब्रिटिश राजवटीमध्ये फार मोठे मानाचे स्थान होते. शहरामध्ये एखादा कार्यक्रम असला की महापौरांचा राजशिष्टाचार मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा होता. राज्यपालांप्रमाणे त्यांनाही एक द्वारपाल होता. जो कायम सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असायचा. पण द्वारपाल आता इतिहास जमा झाला असून २००९ नंतर मुख्य जमादाराच्या अंगात असलेला द्वारपालचा पोशाखच उतरला आहे.

१९३१ सालापासून मुंबईचे महापौर पद अस्तित्वात आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये महापौरांना प्रथम नागरिक हा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे महापौरांचा राजशिष्टाचार तसाच होता. सध्या राज्यपालांचा जसा राज्य शिष्टाचार आहे. तसाच राजशिष्टाचार महापौरांचा होता.

महापौरांच्या अध्यक्षतेखाली १९५२ पर्यंत महापालिकेवर काही खास प्रतिनिधी पदसिद्ध सदस्य म्हणून काम करीत होते. यात पोलीस आयुक्त, बीपीटी अध्यक्ष, कार्यकारी अभियंता इलाका विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते यांचा समावेश होता.

ब्रिटिश काळापासून महापौरांच्या दिमतीला शिपायातील सर्वोच्च पद असलेले द्वारपाल म्हणजेच मुख्य जमादार नियुक्त केले जात होते. महापौर जेथे जातील तेथे द्वारपाल सावलीसारखे त्यांच्यासोबत राहत होते. महापौर दालनाबाहेर या द्वारपालांची नेमणूक असायची.

महापौरांनी बेल वाजवल्यानंतर त्यांच्या दालनात जाण्याचा अधिकार त्यांनाच होता. मुंबईत होणाऱ्या प्रत्येक शासकीय व अन्य कार्यक्रमाच्या ठिकाणी द्वारपाल आवर्जून उपस्थित राहत होते.

पोशाखवाला द्वारपाल दिसणार का?

विशिष्ट पोशाखामध्ये असलेल्या द्वारपालमुळे मुंबई शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर पदे अधिक खुलून दिसत होते. महापौरांचा एक रुबाब होता. त्यामुळे असा पोशाखधारी मुख्य जमादार पुन्हा महापौरांसोबत दिसणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

राजीव पराडकर शेवटचे द्वारपाल

महापौरपदी डॉ. शुभा राऊळ असेपर्यंत मुख्य जमादारांच्या अंगामध्ये विशिष्ट प्रकारचा गणवेश होता. विशिष्ट प्रकारच्या पोशाखात असलेल्या नजीर शेख यांनी अनेकांचे लक्षही वेधून घेतले होते. त्यांच्या निवृत्तीनंतर राजीव नारायण पराडकर या मुख्य जमादाराकडे महापौरांच्या द्वारपालची जबाबदारी आली. त्यांनीही विशिष्ट प्रकारचा पोशाख घालून महापौरांची चाकरी केली. मात्र त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर महापौरांच्या दिमतीला कधी द्वारपाल दिसलाच नाही. त्यामुळे पराडकर शेवटचे द्वारपाल ठरले.

पोशाख घालण्यास जमादारांचा नकार

महापौरांसोबत विशिष्ट प्रकारचा पोशाख घालणारा मुख्य जमादार असावा, यासाठी २००९ पासून महापालिका चिटणीस सध्याचे सचिव प्रयत्नशील होते. परंतु मुख्य जमादार यांनीच अशा प्रकारचा पोशाख घालण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गेल्यास सतरा वर्षात पोशाखधारी द्वारपाल दिसलाच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT