

मुंबई : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत प्राथमिक सहमती झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत पाच जागांसाठी ३:१:१ असा फॉर्म्युला मान्य झाल्याचे समजते. त्यानुसार भाजप तीन जागांवर, तर शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला प्रत्येकी एक एक जागा सुटणार आहे. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप आणि शिवसेने शिंदे गटाचा दावा कायम असल्याने या एका जागेचा तिढा कायम आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठीच्या या निवडणुकीत शिंदे गट अजित पवार गटाने अधिक जागांची मागणी केली होती. मात्र, आधी समन्वय समिती आणि आता मुख्यमंत्री स्तरावर झालेल्या चर्चेनंतर नागपूर आणि पुणे पदवीधर या दोन जागांसह पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे कायम राहणार आहे. तर, अमरावती शिक्षक मतदारसंघ शिववसेना शिंदे गटाला देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिंदे गट आग्रही आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जागेसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. दुसरीकडे भाजपनेही या मतदारसंघावरील आपला दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे महायुतीतील राहिला असून, येत्या काही दिवसांत त्यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा एकमेव तिढा या जागेवर दरम्यान, पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी निवडणूक रणनीतीवरही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. उमेदवारांची निवड, मतदारसंघनिहाय संघटनात्मक तयारी आणि घटक पक्षांमधील समन्वय याबाबत पुढील काळात निर्णय घेतला जाणार आहे.
पुणे आणि नागपूर पदवीधर या दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादीचे अरूण लाड विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला होता. यंदा भाजपकडून शरद लाड यांच्या नावाची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीकडून भैया माने यांचे नाव चर्चेत आहे. दुसरीकडे नागपूर पदवीधरच्या जागेवर गेल्यावेळेस काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले होते.
त्यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला होता. यंदा भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे आणि अनिल सोले यांच्या नावांची चर्चा आहे. या दोन्ही जागांवर भाजपला मागच्या वेळी पराभव पत्करावा लागला तरी पारंपारिक जागा असल्याचा हवाला देत भाजप या जागा आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादीच्या वाट्याला एकच जागा
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण विजयी झाले होते. त्यांचा तो सलग तिसरा विजय होता. यंदाही त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीकडे ही जागा कायम राहणार आहे. पुणे पदवीधरच्या जागेवरील दावा अजित पवार गटाने सोडल्याचे मानले जात आहे.
पुण्याचा तिढा कायम
पुणे शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळेस काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी झाले होते. या जागेवर शिंदेंच्या पक्षाकडून मंगेश चिवटे, सचिन सानप इच्छुक आहेत. तर, भाजपमध्येही इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यामुळे महायुतीची उमेदवारी मिळविण्यावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच आहे. तर, अमरावती शिक्षक मतदारसंघात २०२० च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले किरण सरनाईक पुढे शिवसेना सहयोगी सदस्य बनले. त्यामुळे यंदा शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक आहेत. तर, माजी आमदार श्रीकांत देशपांडे हेही आता शिवसेनेत आहेत. त्यांनीही दावेदारी ठोकली आहे.