Mumbai Marriage Registration Pudhari
मुंबई

Mumbai Marriage Registration: मुंबईत दरवर्षी ३० ते ३५ हजार विवाह नोंदणी; पालिकेच्या नागरी केंद्रांवर वाढती गर्दी

वैदिक, मंदिर व कोर्ट मॅरेजचा वाढता ट्रेंड; शनिवार-रविवारीही नोंदणी सेवा उपलब्ध, तत्काळ प्रमाणपत्राची सुविधा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : एखाद्या शहरात दरवर्षी 30 ते 35 हजार लग्ने होत असल्याचे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही. पण मुंबई शहरात वर्षाला कमीत कमी 30 जास्तीत जास्त 35 हजार लग्ने होतात. यात वैदिक पद्धतीसह मंदिरात होणाऱ्या लग्नासह कोर्ट मॅरेजची संख्या जास्त असल्याचे मुंबई पालिकेकडे होणाऱ्या विवाह नोंदणीवरून स्पष्ट झाले.

मुंबई शहराची लोकसंख्या जसजशी झपाट्याने वाढली तशी लग्नाचीही संख्या गेल्या काही वर्षात वाढलेली दिसून येत आहेत. लग्न कोणत्याही धर्माचं असो पण त्याला कायद्यानुसार विवाह नोंदणी करावीच लागते. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये विवाह नोंदणीसाठी नागरी सेवा केंद्रं उघडण्यात आली आहेत. मुंबईसारख्या धावपळीच्या जीवनामध्ये धामधुमीमध्ये लग्न करण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षात वाढले आहे. त्यामुळे दादरसह शहर व उपनगरात ठिकठिकाणी लग्नाचे हॉल उभे राहिले आहेत. काही पैसेवाले करोडो रुपये खर्च करून जिमखान्याच्या अथवा एखाद्या मैदानामध्ये मोठा सेट उभारून लग्न करतात.

मुंबईत गेल्या काही वर्षात लग्नाची संख्या वाढली आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपूर्वी वर्षाला जेमतेम 15 ते 20 हजार लग्ने होत होती. पण या संख्येत दरवर्षी वाढ होत ही संख्या आता 30 ते 35 हजाराच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या नागरी केंद्राबाहेर विवाह नोंदणीसाठी गर्दी दिसून येते. हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीचे लग्न झाल्यानंतर लग्नाला सुरुवात होते. विशेषत: एप्रिल, मे, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात लग्ने होतात. त्यामुळे या काळात पालिकेच्या नागरीकेंद्रात विवाह नोंदणीसाठी मोठी गर्दी होते. महापालिकेच्या विवाह नोंदणीच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 30 ते 35 हजार विवाह नोंदणी होत असल्याचे दिसून आले आहे.

शनिवार-रविवारीही विवाह नोंदणी

विवाह नोंदणीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिकेने शनिवार व रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही विवाह नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नवरा नवरीला सुट्टीच्या दिवशीही आपली विवाह नोंदणी करता येत आहे. सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी, दररोजच्या 30 विवाह नोंदणीचा कोटा ठेवण्यात आला आहे.

नोंदणीच्या दिवशीच दिले जाते प्रमाणपत्र

कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमधील जलद विवाह नोंदणी सेवा‌’ आहे. तर दुसरी आठवडा अखेरीची विवाह नोंदणी सेवा आहे. या दोन्ही सेवांसाठी नियमित नोंदणी शुल्क, त्याशिवाय 2 हजार 500 अतिरिक्त शुल्क इतकी रक्कम आकारण्यात येते. दोन्ही सेवांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तपासणी व शुल्क भरणा ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित दाम्पत्याला प्रदान करण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT