

मुंबई : मुंबई महापालिकेच्या देवनार प्रसूतिगृहात नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला चुकीचा रक्तगट चढवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.
शनाया शाहीद शरीफ शेख (25) गोवंडी येथील देवनार प्रसूतिगृहात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. प्रसूतीदरम्यान तिला रक्ताची गरज भासल्याने दुपारी 4 वाजता गोवंडी रुग्णालयात असलेल्या पल्लवी खासगी रक्तपेढीतून एक बॅग रक्त आणण्यात आले. रक्त चढविण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही वेळातच तिला उलटी येणे, थंडी वाजण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला सायन रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, शनायाला ओ पॉझिटिव्ह रक्तगटाची आवश्यकता असताना तिला बी पॉझिटिव्ह रक्तगट असलेले रक्त चढविण्यात आल्याचा आरोप तिचा पती शाहीद शेख यांनी केला आहे. रुग्णाला चढविलेल्या रक्ताच्या पिशवीवर पुढील बाजूस ओ पॉझिटिव्ह असे मोठ्या अक्षरामध्ये नमूद होते. मात्र पिशवीच्या मागील बाजूस रक्तासंदर्भात असलेल्या माहितीवर बी पॉझिटिव्ह रक्तगट असल्याची नोंद आहे. यावरून शताब्दी रुग्णालयातील खाजगी पल्लवी रक्तपेढीच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाला चुकीचे रक्त दिल्याचा आरोप रुग्णाचा पती शाहीद यांनी केला.
या प्रकाराबाबत डॉक्टरांना जाब विचारला असता संबंधित डॉक्टर तेथून निघून गेल्याचा तसेच नर्सिंग कर्मचाऱ्यांनी प्रकरण हलक्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने स्थानिक पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून महिलेला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, महिलेची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे सरकारी आरोग्य संस्थांमधील गुणवत्ता नियंत्रण व देखरेख व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सायन रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. परकाश इंगवले यांनी सांगितले की, रूग्णाला 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असली तरी ती पूर्णपणे धोक्याबाहेर नसल्याचे सांगितले. प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत.
महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी हा प्रकार रक्तपेढीतील लेबलिंगच्या त्रुटीमुळे घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे सांगितले. रक्ताची पुन्हा तपासणी करण्यात आली असून ते ‘ओ पॉझिटिव्ह’च असल्याचे आढळले आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.