Buildings Pudhari File Photos
मुंबई

Luxury Homes Mumbai: मुंबईत रोज १६४ कोटींच्या १६ आलिशान घरांची विक्री

एप्रिल ते जून या कालावधीत दररोज एकूण १६४ कोटी मूल्याच्या १६ आलिशान घरांची विक्री झाली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील परवडणाऱ्या घरांची संख्या कमी होत असताना आलिशान घरांची मागणी आणि पुरवठा मात्र झपाट्याने वाढत आहे. एप्रिल ते जून या कालावधीत दररोज एकूण १६४ कोटी मूल्याच्या १६ आलिशान घरांची विक्री झाली.

मुंबईत एप्रिल ते जून या कालावधीत १४ हजार ९०३ कोटी एकूण मूल्याच्या १ हजार ४९९ आलिशान मालमत्तांची नोंदणी झाली. याचाच अर्थ दररोज सरासरी १६ आलिशान घरांची विक्री झाली. त्यांचे एकत्रित मूल्य १६४ कोटी रुपये होते.

दररोज ५ कोटी किंवा त्याहून अधिक किंमतीची घरे विकली जात आहेत. लाईटहाऊस लक्झरीने 'झॅपकी' या मालमत्ता नोंदणी व्यासपीठाच्या सहकार्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

मे महिन्यात व्यवहारांचे प्रमाण २२.७ टक्क्यांनी घटून ४३५ नोंदणींवर आले. त्यांचे एकत्रित मूल्य ४,४९२ कोटी रुपये आहे. यातील प्रत्येक घराची सरासरी किंमत १०.३ कोटी आहे. जून महिन्यात व्यवहारांच्या संख्येत वाढ होऊन ५०१ नोंदणी झाली. यावेळी प्रत्येक घराची सरासरी किंमत ९.४ कोटी होती. एकूण मूल्य ४,६८६ कोटींवर पोहोचले.

एकट्या वरळीत ९७ व्यवहार झाले असून त्यांचे एकत्रित मूल्य २,२७२ कोटी आहे. प्रत्येक घराची सरासरी किंमत २३.४ कोटी आहे. लोअर परळमध्ये ७६९ कोटींचे ८१ व्यवहार झाले. यात ९.५ कोटींच्या घरांचा समावेश आहे. वांद्रे पश्चिम येथे ५४ घरांसाठी ५७५ कोटींचे व्यवहार झाले. येथील सरासरी किंमत १०.६ कोटी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT