BDD Chawl Redevelopment Pudhari
मुंबई

BDD Chawl Redevelopment: बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; लोअर परळमधील ५५७ रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्या

ना. म. जोशी मार्ग प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील तीन पुनर्वसन इमारती पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी व ताबापत्रांचे वितरण.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बीडीडी चाळींसह विविध पुनर्विकास प्रकल्पांतून मुंबईकरांना त्याच ठिकाणी मोठे, प्रशस्त व हक्काचे घर देण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. मुंबईची संस्कृती जपणाऱ्यांना हक्काचे घर दिल्याचे समाधान असून, मूळ मुंबईकरांना मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

फडणवीस यांच्या हस्ते म्हाडाच्या लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ३ पुनर्वसन इमारती पूर्ण झाल्या आहेत.

त्यातील ५५७ पात्र रहिवाशांना सदनिकांची चावी वितरित करण्यात आली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात ११ रहिवाशांना चावी व ताबापत्राचे वाटप करण्यात आले.

पोलिसांच्या घरांच्या प्रश्नांवर मार्ग

२०११ पूर्वीच्या पात्र पोलीस कर्मचाऱ्यांना १५ लाख रुपयांत घरे देण्याचा निर्णय कायम आहे. २०११ नंतरच्या कटऑफमुळे पात्र न ठरणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही विशेष प्रकरण म्हणून बांधकाम खर्चात घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाच्या अंमलबजावणीदरम्यान निर्माण झालेल्या किमतीशी संबंधित तफावती आणि अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

घरे पुढील पिढीसाठी जतन करा

रहिवाशांनी ही घरे आपल्या कुटुंबाची संपत्ती समजून जपावीत. रहिवाशांनी नव्या घरांकडे कुटुंबाचे पिढ्यान्‌पिढ्यांचे वैभव म्हणून पाहावे. चांगली किंमत मिळत असली तरी घरांची विक्री न करता पुढील दोन-तीन पिढ्यांसाठी हा वारसा जतन करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

आनंदाचा क्षण : सुनेत्रा पवार

५५७ कुटुंबांसाठी हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहणारा असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.

वरळीतील पायाभूत सुविधांना गती मिळावी : उपसभापती

बीडीडी चाळ पुनर्विकास हा म्हाडाचा फ्लॅगशिप प्रकल्प ठरला असून, या प्रकल्पामुळे म्हाडाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत नागरिकांच्या मनात असलेली शंका दूर झाली आहे. या प्रकल्पामुळे म्हाडाबाबत नागरिकांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाला असून, कामाठीपुरा आणि उमरखाडी पुनर्विकास प्रकल्पांसाठीही याचा उपयोग होईल, असे विधान परिषद उपसभापती अहिर यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार सुनील शिंदे, आमदार मनीषा कायंदे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि मुंबई म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT