Mumbai Local Train Attack Pudhari
मुंबई

Mumbai Local Train Attack: लोकलमध्ये विडी ओढण्यास विरोध केल्याने प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला

डोळ्याजवळ गंभीर दुखापत; कसारा- सीएसएमटीच्या लोकलमधील थरार; तिघांचे पलायन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कसारा येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये विडी ओढण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका प्रवाशावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी पहाटे कल्याण आणि ठाकुर्ली स्थानका दरम्यान घडली.

या हल्ल्यात भरत टोपले गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या प्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे शहाड प्रतिनिधी भरत टोपले (रा. उल्हासनगर) शुक्रवारी पहाटे कसारा लोकलने प्रवास करत होते. यावेळी लगेज डब्यातील तीन तरुण विडी ओढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

डब्यात इतर प्रवासीही असल्याने त्यांनी संबंधित तरुणांना विडी ओढण्यास मनाई केली. मात्र, याच गोष्टीचा राग आल्याने तिघांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच या वादाचे हिंसक रूपांतर झाले.

लोकल कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान असताना तिघांपैकी एकाने धारदार शस्त्राने भरत यांच्या डोळ्याजवळ वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. सुदैवाने त्यांचा डोळा थोडक्यात बचावला. हल्ल्यानंतर आरोपींनी पुढील स्थानकावर उतरून पळ काढला. अशा रक्तबंबाळ अवस्थेतही भरत टोपले यांनी लोकलमधूनच घटनेचा व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर कैफियत मांडली आहे.

या घटनेनंतर कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने कसारा मार्गावरील लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

रात्रीच्या लोकलमध्ये काही ठिकाणी जुगार खेळणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे आणि टोळक्यांनी डब्यांमध्ये ठाण मांडून बसणे असे प्रकार होत असल्याच्या तक्रारी संघटनेने केल्या आहेत.

विशेषतः लगेज डब्यांमध्ये अनधिकृत व्यक्तींचा वावर आणि प्रवाशांना होणारा त्रास याकडे रेल्वे सुरक्षा यंत्रणेचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

लोकलमध्ये किरकोळ वादातून झालेले रक्तरंजित थरार

नोव्हेंबर २०२६ (पश्चिम रेल्वे) : अंधेरी स्थानकाजवळ दोन प्रवाशांच्या भांडणात एकाने फेकलेला चाकू चुकून ५३ वर्षीय निरपराध प्रवासी सुरेश शर्मा यांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

४ नोव्हेंबर २०२६ (पश्चिम रेल्वे): बोरिवली-नायगाव दरम्यान धावत्या लोकलमध्ये विनयभंगाला विरोध केल्याने एका नराधमाने २० वर्षीय तरुणीला धावत्या ट्रेनसमोर ढकलले. यामध्ये तिला हात गमवावा लागला.

२३ जून २०२६ (पश्चिम रेल्वे) : अंधेरी-बोरिवली दरम्यान चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलच्या दरवाजाजवळ पावसाचे पाणी उडाल्याच्या वादातून मयंक लोहार (२२) याची चाकूने भोसकून हत्या केली.

१९ जून २०२६ (पश्चिम रेल्वे) : भाईंदर स्थानकाजवळ लेडीज स्पेशल लोकलमध्ये दोन महिला प्रवाशांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघीही रक्तबंबाळ झाल्या.

जून २०२६ (मध्य रेल्वे) : वांगणी-कर्जत दरम्यान खोपोली लोकलच्या लगेज डब्यात सीटवर बसण्यावरून झालेल्या वादातून तरुणांच्या टोळक्याने सतीश कुमार पाठक या प्रवाशावर चाकूहल्ला केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT