Local Train Door System
मुंबई : मुंब्रा येथे रेल्वे मार्गात पडून प्रवाशांच्या झालेल्या मृत्यूनंतर मध्य रेल्वे प्रशासनाला लोकलला एसी लोकलच्या धर्तीवर स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा साक्षात्कार झाला आहे. दहा वर्षांपूर्वी स्वयंचलित दरवाजा बसवण्याचा प्रयोग झाला होता. पण या प्रयोगानंतर प्रत्यक्षात अंमलबजावणी झालीच नाही.
मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ सोमवारी सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास कसारा-सीएसएमटी जलद ट्रेनमधील दहा प्रवासी रेल्वे मार्गात कोसळले. यात चार जणांचा मृत्यू झाला असून अन्य प्रवासी जखमी आहेत. या जीवघेण्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाकडून साध्या लोकलला स्वयंचलित दरवाजा बसवण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वीही गर्दीच्या वेळी दरवाजावर उभे असलेले प्रवासी पडून होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा प्रयोग म्हणून काही लोकलला स्वयंचलित दरवाजेही बसवण्यात आले होते. पण हा प्रयोगच राहिला. त्यानंतर स्वयंचलित दरवाजे बसवण्यासंदर्भातील चर्चेला पूर्णविराम मिळाला.
साध्या लोकलला बसवण्यात आलेल्या स्वयंचलित दरवाजाचा एक महिना अभ्यास केल्यानंतर दरवाजा उघडणे व तो पुन्हा बंद होण्यास जास्त कालावधी लागत होता.
त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त काळ स्टेशनवर लोकलला थांबा द्यावा लागत होता. परिणामी लोकलचे वेळापत्रक कोलमडून जात होते. त्यामुळे स्वयंचलित दरवाजाचा प्रयोग अयशस्वी झाल्याचे रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्वयंचलित दरवाजाचा रेल्वे प्रशासन विचार करत असल्यामुळे याची १०० टक्के अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वसामान्य लोकल व एसी लोकल रेल्वे स्टेशनवर थांबल्यानंतर त्यांच्या थांबण्याच्या वेळेमध्ये मोठा फरक आहे. सर्वसामान्य लोकल स्टेशनवर थांबल्यानंतर पुन्हा सुटेपर्यंत जर ३० ते ३५ सेकंदाचा वेळ घेत असेल तर एसी लोकल ४० ते ४५ सेकंद वेळ घेते. एसी लोकल पूर्णपणे थांबल्यानंतर दरवाजा उघडतो त्यानंतर प्रवासी उतरतात व चढतात त्यानंतर दरवाजा बंद झाल्यानंतर ही लोकल सुटते. त्यामुळे साध्या लोकलपेक्षा एसी लोकलचा रेल्वे स्टेशनवर थांबण्याचा वेळ जास्त असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.