

मुंबई : Mumbai Local Train | सकाळ-संध्याकाळच्या पीक अवरमध्ये लोकलच्या खचाखच गर्दिने भरलेल्या डब्यात शिरल्यानंतर मुंबईकरांचा श्वास घुसमटतो. प्रवास नकोसा होतो. प्रवाशांची ही घुसमट दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने यंदाच्या अर्थसंकल्पात वंदे भारत एक्सप्रेसप्रमाणे अत्याधुनिक आणि उत्तम वेटिंलेशन असलेल्या नवीन लोकल (इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट) सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. या आधुनिक रेकसाठी सध्या डिझाइन विकसित केले जात असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी केली.
अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईला किती निधी मिळाला याची माहिती देण्यासाठी रेल्वेमंत्र्यानी व्हिडीओ कान्फरन्स घेतली. ते म्हणाले, महाराष्ट्राला २३ हजार ७७८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात वाटप केलेल्या निधीपेक्षा यंदा २० पट जादा निधी देण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात रहजार १५ किमी नवीन ट्रॅक टाकला आहे. जे मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कपेक्षा जास्त आहे. याकरिता साधरणतः १ लाख ७० हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. तसेच राज्यातील ३ हजार ५८६ किमी ट्रॅकचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि पर्यावरणपूरक झाले आहे. विविध मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांतर्गत (एमयुटीपी) एकूण १६ हजार ४०० कोटींचे ३०१ किमीचे नवीन रेल्वेमार्ग टाकले जात आहेत. सध्याच्या तीन हजारांपेक्षा जास्त लोकल उपनगरीय रेल्वे मार्गावर धावतात. लोकलची संख्या १० टक्यांनी वाढविण्यासाठी एमयुटीपीचे प्रकल्प पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेण्यासह, गर्दी कमी करण्यासाठी लोकलच्या आणि मेल-एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी परेल, जोगेश्वरी आणि वसई येथील नवीन टर्मिनल्ससह सीएसएमटी, कल्याण, पनवेल, मुंबई सेंट्रल, आणि एलटीटी या सारख्या विद्यमान टर्मिनल्समध्ये क्षमता वाढीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे लोकलच्या ३०० नवीन फेऱ्या चालविता येणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, १३२ स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे.
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरवर, वैष्णव यांनी सांगितले की ३४० किमीचे काम पूर्ण झाले आहे. समुद्राखालील बोगद्याचे बांधकाम समाधानकारकपणे सुरू आहे. जपान सरकार कॉरिडॉरवर शिंकानसेन ट्रेन सेट सुरू करण्यास उत्सुक आहे.
कमी अंतराच्या दोन शहरांमध्ये दिवसभरात अनेक फेऱ्या करण्यासाठी रेल्वेने नमो भारत ट्रेन प्रवासी सेवेत आणल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात ५० नमो भारत ट्रेनची निर्मिती करण्यात येणार आहे. या ट्रेन महाराष्ट्रातील पुणे -नाशिक, कल्याण-नाशिक अशा मार्गावर चालविण्याचे नियोजन आहे. परंतु मध्य रेल्वेच्या कसारा आणि कर्जत घाटात १३७ ग्रेडीयंटचे घाट आहेत. त्यावरुन या ट्रेन धावणार का, याची चाचणी करणे आवश्यक असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकार, रेल्वे मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत, आरबीआय सुरुवातीला महाराष्ट्राच्या वाट्यापैकी ५० टक्के रक्कम रेल्वे प्रकल्पांसाठी जारी करेल, ज्याची नंतर राज्य सरकार परतफेड करेल. यामुळे रेल्वे प्रकल्पांना तात्काळ निधी मिळणार असल्याने प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल. त्रिपक्षीय करार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.