मुंबई: भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने १५ डब्यांच्या लोकल सेवांचा विस्तार केला आहे. सीएसएमटी ते कर्जत, खोपोली या मुख्य मार्गावरील २२ अतिरिक्त १२ डब्यांच्या गाड्यांचे श्रेणीवर्धन करून त्या १५ डब्यांच्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे १५ डब्यांच्या लोकल सेवांची संख्या ३२ वरून ५४ होईल. यापैकी ११ लोकल पीक अवर्समध्ये धावणार आहेत.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले की, प्रत्येक लोकलमध्ये तीन अतिरिक्त डबे जोडण्यात येतील.
मध्य रेल्वे मार्गावर पहिल्यांदा १६ ऑक्टोबर २०१२ रोजी १५ डब्यांची लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी १६ लोकल १५ डब्यांच्या होत्या. त्यानंतर ४ एप्रिल २०१९ रोजी आणखी ६ लोकल सेवा १५ डब्यांच्या करण्यात आल्या आणि ही संख्या २२ वर पोहोचली. असे असले तरी एकूण लोकल सेवांची संख्या १,८२० इतकीच राहील.
कुणाला फायदा?
या १५ डब्यांच्या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत/खोपोली मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोली या भागांतून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्याचा विशेष फायदा होणार आहे.