Mumbai Lake  Pudhari
मुंबई

Mumbai Lake Water Storage: मुंबईचा जलसाठा ७७ टक्के; २४ तासांत १ लाख १४ दशलक्ष लिटर वाढ

भातसा तलावातील पाणीसाठ्यानेही ५ लाख दशलक्ष लिटरचा टप्पा ओलांडला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात धो..धो.. ओतलेल्या पावसामुळे पाणीसाठा ७७ टक्केवर पोहचला आहे. गेल्या २४ तासात शहराला एक महिना पुरेल इतकी म्हणजे १ लाख १४ हजार दशलक्ष लीटर इतकी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. भातसा तलावातील पाणीसाठ्यानेही ५ लाख दशलक्ष लिटरचा टप्पा ओलांडला आहे.

तलावातील पाण्याने तळ गाठल्यामुळे महापालिकेने २० टक्के पाणीकपात लागू करून, राखीव कोट्यातील पाणी घेण्यास सुरुवात केली होती. परंतु वरूण राजा मुंबईकरांच्या हाकेला धावून आल्यामुळे जुलैमध्ये तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली.

अवघ्या २५ दिवसांमध्ये पाणीसाठ्यात साडेदहा लाख दशलक्ष लिटर वाढ झाली. परंतु तलाव पूर्ण भरेपर्यंत पाणी कपात सुरूच राहणार आहे. पाणलोट क्षेत्रात २३ जुलैला १० लाख ९ हजार ४३२ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. २४ जुलैला म्हणजे २४ तासात हा पाणीसाठा ११ लाख २३ हजार ४४३ दशलक्ष लिटरवर पोहचला.

विशेष म्हणजे शहराला दररोज सर्वाधिक १८५० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठाही ५ लाख २७ हजार दशलक्ष लिटर्स पोहचला आहे. या तलावामध्ये सर्वाधिक ७ लाख १४ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.

नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव क्षेत्रात गेल्या २४ तासांत २९० पावसाची नोंद झाली. त्यामुळे या तलावातील पाणीसाठ्यात ३० हजार दशलक्ष लिटरने वाढ झाली. या तलावातील पाणीसाठा आता १ लाख ४२ हजार ९७६ दशलक्ष लिटरवर पोहचला आहे.

तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर्स)

अप्पर वैतरणा - १,४२,९७६ (६३ टक्के)

मोडक सागर - १,२८,९२५ (१०० टक्के)

तानसा - १,४५,०८० (१०० टक्के)

मध्य वैतरणा - १,४५,४१२ (७५ टक्के)

भातसा - ५,२७,०८७ (७७ टक्के)

विहार - २७,६९८ (१०० टक्के)

तुळशी - ८,०४५ (१०० टक्के)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT