Mumbai Krida Bhavan Pudhari
मुंबई

Mumbai Krida Bhavan: मुंबईतील शतकभर जुन्या क्रीडाभवनावर टाऊन हॉलचा प्रस्ताव; कर्मचारी व लोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध

1926 पासूनचा वारसा जपण्याची मागणी; पुनर्विकासात क्रीडाभवन कायम ठेवण्याचा ठराव

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : क्रीडा भवनाच्या जागी टाऊन हॉल बांधण्याच्या मुंबई महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला लोकप्रतनिधींनी विरोध केल्यानंतर आता महापालिका कर्मचारीही आक्रमक झाले आहेत. एकत्र येत त्यांनी सोमवारी 100 वर्षांचा इतिहास असलेल्या क्रीडाभवनाची ओळख पुसू नका, अशी मागणी केली आहे.

क्रीडाभवनचे 12 हजार सदस्य असून अडीच हजारांपेक्षा जास्त आजीव सदस्य आहेत. यात नगरसेवकांचाही समावेश आहे. त्यामुळे सध्याची क्रीडा भवांची इमारत वाचवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात लढाई लढण्याचा निर्णय घेतला.

मुंबई महानगरपालिका क्रीडाभवन शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी सभासद, खेळाडू, आजीव सभासद, नगरसेवक यांची यांची संयुक्त बैठक सोमवार 30 मार्चला सीएसएमटी येथील मुख्य क्रीडाभवन, बॅडमिंटन कोर्ट येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी क्रीडाभवनाच्या जागी टाऊन हॉल उभारण्याचा पालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यात आला.

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी पालिकेने 1926 मध्ये क्रीडा भवनाची स्थापना केली. या क्रीडा भवनातून अनेक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय स्तरावर नेत्रदिपक कामगिरी केली. त्यामुळे सध्याची क्रीडा भवन कोणत्याही परिस्थितीत गमवायचे नाही, असा ठराव बैठकीत घेण्यात आला.

क्रीडा भवनाच्या जागी टाऊन हॉल बांधा अथवा महापालिका सभागृह पण विविध क्रीडा प्रकारासाठी आरक्षित असलेल्या सध्याच्या जागेपैकी एक इंचही जागा सोडणार नाही. नवीन इमारत बांधल्यानंतर क्रीडा भवनासाठी जागा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात यावी, असा ठरावही मंजूर करण्यात आला.

बैठकीतील इतर ठराव

27 एप्रिलला शताब्दी महोत्सव साजरा करणे.

नियोजित पुनर्विकासात क्रीडा भवन अस्तित्व कायम ठेवणे.

महापौरांसह समिती

अध्यक्षांना क्रीडा भवनाचा पुनर्विकास टाळण्यासाठी निवेदन देणे.

टाऊन हॉलचा प्रस्ताव

स्थायी समितीने रोखला

मुंबई महापालिका प्रशासनाने टाऊन हॉल बांधण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव काही समितीने रोखून धरला आहे. टाऊन हॉल ऐवजी येथे महापालिका सभागृह उभारावे, अशी मागणी समिती सदस्यांची आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर न करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT