मुंबई : मुळ मुंबईकर असणाऱ्या भुमीपूत्र कोळी समाजावर महापालिका प्रशासनाकडून आजही अन्यायच होत आहे. मुंबई महापालिका जुहूसह मुंबईतील महत्त्वाच्या चौपाटी वेळोवेळी स्वच्छ करत असताना कोळीवाड्यातील समुद्रकिनाऱ्याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे चौपाटी स्वच्छ तर, कोळीवाडे अस्वच्छ, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून शुक्रवारी महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.
मुंबई शहराला सुमारे ११४ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीतील काही किनारपट्टी पर्यटकांसाठी खुली असून अन्य किनारपट्टीत कोळीवाडे आहेत. परंतु मुंबई महानगरपालिका केवळ पर्यटकांसाठी खुल्या असलेल्या समुद्रकिनाऱ्यांची वेळोवेळी स्वच्छता करते.
त्यामुळे या चौपट्या स्वच्छ दिसतात. परंतु महापालिका प्रशासनाकडून कोळीवाड्यालगतच्या समुद्रकिनाऱ्याची साफसफाई कधीच होत नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आढळून येतो, बकालपणा पहावयास मिळतो याकडे शुक्रवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधत कोळीवाड्याबाबतीत केला जाणारा हा दुजाभाव थांबवा, असे प्रशासनाला ठणकावून सांगितले.
कोळीवाड्यांना सुविधा देण्याची मागणी
समुद्र प्रदूषण, समुद्रात होणारा सांडपाण्याचा विसर्ग, समुद्रात जाणारा प्लास्टिक व अन्य घनकचरा, अतिक्रमणे, सागरी जैवविविधतेचा ऱ्हास तसेच कोळीवाड्यातील विविध समस्या यामुळे मत्स्यव्यवसाय, पर्यावरणीय संतुलन व मुंबईच्या जागतिक प्रतिमेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
त्यामुळे समुद्र किनाऱ्याची स्वच्छता व सौंदर्यकरण, सागरी जैवविविधतेचे संरक्षण, कोळीवाड्यांच्या मूलभूत सुविधांचा विकास, सागरी पर्यटनाला प्रोत्साहन अशा विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी नगरसेवकांकडून करण्यात आली.
कोस्टल समिती स्थापन करा
मुंबईच्या समुद्र किनारपट्टीचे संवर्धन, संरक्षण करण्यासाठी महापालिकेअंतर्गत स्वतंत्र कोस्टल समिती स्थापन करण्यात यावी. या समितीमध्ये कोळी समाजाचे प्रतिनिधी किनारा विभागाचे नगरसेवक सागरी व पर्यावरण विभागातील तज्ञ मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश करण्यात यावा, असा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला.