Mumbai Airport Terminal 2 System Down Today
मुंबई : रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई विमानतळावर शनिवारी मनस्तापाचा सामना करावा लागला. तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावरील 'सिस्टम डाऊन' झाली असून चेक इन काऊंटवर मॅन्यूअल मोडवर तिकीट दिले जात होते. त्यामुळे प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून तांत्रिक बिघाडाचं कारण काय हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. तब्बल तासाभरानंतर प्रणाली पूर्ववत झाली असून आता चेक इन काऊंटरवरील काम नीट सुरू असल्याचे समजते.
एअर इंडियाने प्रवाशांसाठी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. यात एअर इंडियाने म्हटलंय की, मुंबई विमानतळावर टी- 2 टर्मिनलवर डेटा नेटवर्कमध्ये बिघाड झाल्याने सिस्टम डाऊन झाल्या होत्या. यामुळे चेक इन काऊंटवर गर्दी वाढली असून प्रणालीमधील बिघाड दुरूस्त करण्यात आला आहे. बिघाडाचा फटका विमानांच्या टेक ऑफलाही बसला असून विमाने उशिराने झेपावत आहेत, असं एअर इंडियाने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोशल मीडियावरही युजर्सनी मुंबई विमानतळावरील गोंधळासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. 'मुंबई विमानतळावर सिस्टम डाऊन झालीये. वायफायदेखील चालत नाहीये', असं एका युजरने X पोस्टमध्ये म्हटले आहे. तर आणखी एका युजरने असं म्हटलंय की, 'चेक इन काऊंटरवर गोंधळाची स्थिती होती. सिस्टम डाऊन झाल्याने मॅन्यूअली चेक इन सुरू होते आणि यामुळे उशिर होत होता. विमानतळावर येणाऱ्या वेळेच्या अगोदरच पोहोचावं म्हणजे फार तारांबळ उडणार नाही'.
साधारण संध्याकाळी साडे चारच्या सुमारास हा बिघाड झाल्याचे समजते. तासाभरातच सिस्टम पूर्ववत करण्यात आल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. आता सिस्टम नीट सुरू झाली असून लवकरच चेक इन काऊंटरवरील गर्दी कमी होईल, असंही सांगितलं जातंय. ऐन सणासुदीच्या दिवशी हा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.