मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील सहा फुटापेक्षा उंच पीओपी मूर्तींचे समुद्रासह नैसर्गिक तलावामध्ये विसर्जन करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुर्त्यांच्या विसर्जनासाठी चौपाट्यांसह नैसर्गिक विसर्जन स्थळी सेवा-सुविधा पुरवण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने जुन्याच कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सहा फुटापेक्षा उंच पीओपी मूर्तींना समुद्रसह नैसर्गिक तलावात विसर्जन करण्यास बंदी होती. याबाबत गेल्या दोन महिन्यापासून हे प्रकरण हायकोर्टामध्ये सुरू होते. अखेर गुरुवारी कोर्टात झालेल्या सुनावणीत पीओपी उंच मूर्तींना समुद्र व नैसर्गिक तलावात विसर्जनाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने विविध प्रक्रिया राबवून विसर्जन स्थळी सेवा सुविधा पुरवण्यासाठी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
गिरगाव, दादर, जुहू, माहीम, सात बंगला, वेसावे आदी चौपट्यांसह ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. समुद्रात विसर्जनासाठी येणाऱ्या मोठ्या गणेश मुर्त्यांची वाहने वाळूमध्ये रूतू नये म्हणून वाळूच्या पृष्ठभागावर अंथरण्यासाठी ६ मी. लांबी व १.८२ मी. रुंदी तसेच १६ मी.मी. जाडीच्या अतिरिक्त नवीन ५६१ नग स्टील प्लेट्स भाडेतत्त्वावर घेण्याच्या सूचना या अगोदरच देण्यात आल्या आहेत.
विसर्जन स्थळी पुरविण्यात येणाऱ्या सुविधा
स्टील प्लेट, नियंत्रण कक्ष, जीव रक्षक, मोटर बोट, प्रथम उपचार केंद्र रुग्णवाहिका, स्वागतकक्ष, तात्पुरती शौचालय, निर्माल्य कलश, निर्माल्य वाहन, डंपर, टेम्पो, फ्लड लाईट, सर्च लाईट, निरीक्षण मनोरे, जर्मन तरफा
जुन्याच कंत्राटदाराची नियुक्ती
गिरगाव चौपाटीवर फुलाच्या सजावटीसह व्हीआयपी, कॉनस्यूलेटस आणि पालिका कर्मचाऱ्यांसाठी आसन व्यवस्थेसह (फर्निचर) माईल्ड स्टील स्ट्रक्चरमध्ये डेकोरेटिव्ह वॉटरप्रूफ शामियाना आणि एनजीओ, व पालिकेसाठी वॉच टॉवर आणि अतिरिक्त पंडालची उभारणी. गिरगाव चौपाटी येथे परदेशी पाहुण्यांसाठी आसन व्यवस्थेसह (फर्निचर) माईल्ड स्टील स्ट्रक्चरमध्ये डेकोरेटिव्ह वॉटरप्रूफ शामियाना उभारणी आणि सुखसागर, कॅफे आयडियल येथे टीव्ही जर्नलिस्ट करीता पंडाल उभारणी आणि विविध ठिकाणी स्टील बॅरीकेडींग उभारण्यासाठी जुन्याच कंत्राटदाराला कंत्राट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गणेशोत्सव समन्वय समितीने केले स्वागत
हायकोर्टाने उंच मूर्तींना नैसर्गिक स्थळी विसर्जन करण्यास परवानगी दिल्यामुळे या निर्णयाचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने स्वागत केले आहे. याप्रकरणी कोर्टात योग्य बाजू मांडल्याबद्दल समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी आभार मानले आहेत.