मुंबई : मुंबईसह उपनगरात शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या रेल्वेच्या तिन्ही मार्गाचे वेळापत्रक बिघडवले. नालासोपारा आणि विरार दरम्यान पाणी रुळांवर साचल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्या १५ ते २० मिनिटांने उशिरा धावत होत्या. तसेच मध्य रेल्वे मार्गात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने सीएसएमटी ते कल्याण मार्गावर गाड्या सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्याचा मोठा फटका नोकरीनिमित्त प्रवासासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना बसला.
मुंबई उपनगरीय चर्चगेट - डहाणू रोड पश्चिम रेल्वे मार्गात नालासोपारा आणि विरार, वसई दरम्यान मुसळधार पावसामुळे येथे पूर स्थिती निर्माण झाली होती. येथील रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्या १५ ते २० मिनिटांच्या विलंबाने धावत होत्या. विरार, वसई, नालासोपारा स्टेशन परिसरात पाणी तुंबल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले होते.
केळवे येथे तांत्रिक बिघाड
पावसामुळे काही मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले. पश्चिम रेल्वेवरील गाडी क्रमांक ५९०४५ मुंबई सेंट्रल - वापी पॅसेंजर आणि गाडी क्रमांक ५९०४० वापी मुंबई सेंट्रल पॅसेंजर रद्द करण्यात आली. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड येथे शनिवारी सकाळी ११.५० च्या सुमारास मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला.
मध्य रेल्वे २५ ते ३० मिनिटे उशिरा
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कुर्ला पूर्व रेल्वे स्थानक परिसरात पाणी तुंबल्याने येथील संपूर्ण स्टेशन रस्ता जलमय झाला होता. रुळांवर ही मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. मुलुंड-विक्रोळी दरम्यान, भांडुप आणि डोंबिवली येथे रुळांवर पाणी साचल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या गाड्या सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.
ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होती. तसेच सीएसएमटी - पनवेल, ठाणे वाशी आणि पनवेल, नेरुळ उरण लोकल सेवा ही काही मिनिटे विलंबाने धावत होती. हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर सुद्धा लोकल गाड्या संथगतीने धावत होत्या. मजीद बंदर, डॉकयार्ड रोड, शिवडी, वडाळा अशा महत्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होती. अनेक गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना ट्रेनसाठी स्थानकावर ताटकळत उभे रहावे लागत होते.