

वसई : वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळे अनेक तास पाण्याखाली येऊन, यामुळे चर्चगेट ते विरार विरार ते चर्चगेट अशा अप आणि डाऊन मार्गांवरील लोकल सेवा दुपारी मंदावली होती . त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ रेल्वे स्थानकात लोकलची वाट पाहत उभे रहावे लागले.
वसई विरार शहरात मुसळधार पावसामुळे विविध भागात पाणी साचले आहे. यामुळे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था तसेच महामार्ग आणि राज्यमार्गांवरील दळवळणही मंदावले आहे. तर शहरातील मुसळधार पावसाचा लोकल सेवेलाही फटका बसल्याचे दिसून येत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी वसई विरारमधून लोकलने प्रवास करतात. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या पावसामुळे हीच लोकल सेवा विसकळीत झाली आहे.
यामुळे नागरिकांना लोकलची वाट पाहत बराच वेळ रेल्वे स्थानकात उभे राहावे लागत आहे. तर उशिराने धावणाऱ्या लोकल आणि रेल्वे स्थानकात उसळणारी गर्दी यामुळे गर्दीने भरलेल्या लोकलमधून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर ओढवली आहे. तर सलग चौथ्या दिवशी पावसाने वसई विरार शहराला झोडपून काढले असून वसई ते नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.
रेल्वे रुळांवर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते विरार या दोन्ही मार्गांवर लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. उशिराने धावणाऱ्या लोकल सेवांमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वे सेवा सुरळीत झालेली नव्हती.