मुंबई: सूर्याच्या प्रकोपामुळे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये बुधवारी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
सांताक्रूझ वेधशाळेमध्ये मंगळवारी पारा 39 अंशांवर गेला. सोमवारच्या तुलनेत (38.9 अंश सेल्सिअस) कमाल तापमानात वाढ कायम राहिली. बुधवारी (37 अंश सेल्सिअस) किंचित घट अपेक्षित आहे. मंगळवारी मुंबई महानगर प्रदेशातील काही भागात कमाल तापमान 38-40 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले. जोरदार कोरडे वारे आणि कमकुवत समुद्री वाऱ्यांमुळे किनारपट्टीवरील थंड वारे बंद झाले आहे. ज्यामुळे सतत उष्णता वाढत आहे, असे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
मार्चच्या सुरुवातीलाच मुंबईत उष्णतेची लाट जाणवत असून हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार 37 अंशांपेक्षा जास्त तापमान सलग दोन दिवस राहिल्याने उष्णतेची लाट घोषित केली आहे. गेल्या चार दिवसांत तापमान 38 ते 40 अंशांच्या घरात पोहोचल्याने मुंबई, ठाणे आणि पालघर भागात उकाड्याचा इशारा देण्यात आला आहे.
महामुंबई प्रदेशासह राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने राज्यभरातील आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. संभाव्य उष्माघाताच्या घटनांना तोंड देण्यासाठी जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांनी ‘कोल्ड रूम’ कार्यान्वित ठेवणे, औषधांचा पुरेसा साठा ठेवणे आणि संबंधित पोर्टलवरील नोंदी नियमित अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नागरिकांनी दुपारच्या तीव्र उष्णतेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे परिधान करणे आणि उष्माघातापासून बचावाचे उपाय पाळावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.