मुंबई : ‘ग्रीन फटाके’ म्हणून विकल्या जाणाऱ्या फटाक्यांमध्येही बेरियमसारख्या रासायनिक घटकांचा वापर होत असल्याचा दावा आवाज फाउंडेशनने केला आहे. मोहम्मद अली रोड आणि कुर्ला येथून ९ आणि १० ऑक्टोबर रोजी खरेदी केलेल्या १७ फटाक्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील काही नमुन्यांमध्ये बेरियम आढळल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. तसेच काही फटाक्यांवर क्यूआर कोड नसल्याचे, तर काहींच्या कोडच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून फटाक्यांच्या विक्रीपासून प्रत्यक्ष वापरापर्यंत निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
काही नमुन्यांत बेरियमचे प्रमाण लक्षणीय
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘कलर कोटी’ नमुन्यात बेरियमचे प्रमाण ८.७४ टक्के, ‘पूजा प्लेन’मध्ये १३.६१३ टक्के, तर ‘लिओ’मध्ये ९.९४१ टक्के आढळल्याची नोंद तपासणी अहवालात आहे. ‘सर्पेंट एग बिग’ या नमुन्यात बेरियमचे प्रमाण २७.४०५ टक्के असल्याचेही अहवालात नमूद आहे. काही नमुन्यांमध्ये ॲल्युमिनियम, गंधक, सिलिकॉन आणि पोटॅशियमसह अन्य रासायनिक घटक आढळल्याचे संस्थेने म्हटले आहे.
विक्री केंद्रांच्या तपासणीची मागणी
परवानाधारक विक्रेत्यांकडील फटाक्यांचीही तपासणी करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे. नवरात्र, दसरा, गुरुनानक जयंती, नाताळ आणि नववर्षाच्या काळात फटाक्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी वितरण, विक्री आणि प्रत्यक्ष वापर या तिन्ही टप्प्यांवर निर्बंध लागू करावेत, असे पत्रात म्हटले आहे.
फटाक्यांबरोबरच मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक आणि लेझर दिव्यांच्या वापरावरही निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे. हिवाळ्यात वायुप्रदूषणाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन संस्थेने केले आहे.