मुंबई: गणेशोत्सव मंडळांना प्रवेशद्वारापासून १०० मीटर अंतराबाहेर व पदपथ, रस्त्यावर जाहिरात लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. महानगरपालिकेने जाहिरात प्रदर्शित करण्याचे निकष जाहीर केले असून याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मंडळांना करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मंडळाकडून जागा मिळेल तिथे जाहिरात फलक लावले जातात. त्यामुळे संपूर्ण रस्ते व पदपथ जाहिरातीने भरून जात आहेत. त्यामुळे शहराचे होणारे विद्रूपीकरण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने जाहिरात प्रदर्शित करण्याबाबतचे निकष निश्चित केले आहेत.
गणेशोत्सव मंडळांना मंडपाच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटर अंतरापर्यंत व्यावसायिक जाहिरात प्रदर्शित करण्यास परवानगी राहणार आहे. यासाठी सरसकट १०१ रुपये इतके शुल्क घेण्यात येणार आहे. १०० मीटर अंतराबाहेरील प्रवेशद्वारावर व्यावसायिक जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
मंडळांना गुटखा तंबाखू संबंधीच्या उत्पादनाची तसेच मद्याच्या कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यात पूर्णपणे बंदी राहणार आहे.
चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका संबंधी जाहिरातीमध्ये अश्लील जाहिराती प्रदर्शित करण्यासही प्रतिबंध असेल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
जाहिरात प्रदर्शित करताना पदपथावरील वादकचारांना तसेच रस्त्यावरील वाहतुकीला कुठल्याही प्रकारे अडथळा होणार नाही याची गणेशोत्सव मंडळाने दक्षता घ्यावी, अन्यथा अशा जाहिरातीवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेच्या परवाना विभागाकडून देण्यात आला आहे.
डिजिटल स्क्रीनला वाहतूक पोलिसांचे परवानगी बंधनकारक
डिजिटल माध्यमातून जाहिरात प्रदर्शित करण्याकरिता १०० चौरस फूट मर्यादेपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्याची परवानगी आहे. मात्र यासाठी वाहतूक पोलीस व स्थानिक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. जाहिरातीमध्ये सामाजिक व नागरिक संदेश लावणे बंधनकारक आहे.
उत्सवानंतर जाहिरात फलक काढणे आवश्यक
गणेशोत्सव काळापूर्ती जाहिरातीला परवानगी राहणार आहे. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जाहिरात काढून टाकणे मंडळांना बंधनकारक राहील. अन्यथा या जाहिराती मुंबई महानगरपालिकेतर्फे काढण्यात याव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्त यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.