मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन जगभरातील पर्यटकांना घडविणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याची समृद्ध परंपरा जागतिक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील विविध गणेशमंडळांना भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
देसाई म्हणाले, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे, सामाजिक एकतेचे आणि लोकसहभागाचे प्रतीक आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, परंपरा, इतिहास, लोकजीवन आणि आतिथ्यशीलता जगभर पोहोचत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटनाचा अनुभव मिळावा, यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांना दिली भेट
माटुंगा येथील खालसा महाविद्यालयात परदेशी पाहुण्यांचे पारंपरिक फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी मुंबईतील माटुंगा येथील जी.एस.बी. गणपती, वडाळा येथील जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव-गणेश गल्ली येथील ‘मुंबईचा राजा’, गिरगावातील केशवजी नाईक चाळ येथे भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले.
यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परदेशी मान्यवरांचे या उपक्रमाला भेट दिल्याबद्दल आभार मानले.