Mumbai FDA Action: मुंबईत अन्नभेसळीविरोधात एफडीएची धडक मोहीम; चार हॉटेलसह नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित

मिठाई, खवा, पनीरचा साठा जप्त
Mumbai FDA Action
Mumbai FDA ActionPudhari
Published on
Updated on

मुंबई: गणेशोत्सव आणि आगामी नवरात्र, दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्न भेसळीविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ या अभियानांतर्गत ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान बृहन्मुंबई विभागात मिठाई, खवा, पनीर, तूप, दूध, फरसाण, सुकामेवा आदींच्या उत्पादकांपासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत तपासणी करण्यात आली. या मोहिमेत ३८ अन्न आस्थापनांची तपासणी करून ४७ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.

तपासणीत अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. एका आस्थापनाला २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अयोग्य साठवणूक, अपुरे लेबलिंग, तापमान नियंत्रणातील त्रुटी, स्वच्छतेचा अभाव आणि अनुसूची-४ मधील नियमांचे उल्लंघन अशा त्रुटी तपासणीत समोर आल्या.

Mumbai FDA Action
Lalbaug Raja News: महिला पोलिसाशी हुज्जत घालून अश्‍लील शिवीगाळ; दोघांविरुद्ध गुन्हा

बिर्याणी सेंटर, डेअरी आणि काजू विक्रेत्यावरही कारवाई

कांदिवली पूर्वेतील महाराष्ट्र बिर्याणी सेंटरच्या तपासणीत अनुसूची-४ मधील नियमांचे उल्लंघन आढळले. त्यामुळे परवाना निलंबित करण्यात आला. घाटकोपर पश्चिमेतील त्रिभुवन डेअरी फार्म आणि घाटकोपर पूर्वेतील महावीर काजू अँड फूड्स प्रा. लि. यांच्या तपासणीतही अनुसूची-४ मधील त्रुटी आढळल्याने दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

याशिवाय रुहाफ्झा बेकरी, चंद्रूज प्युअर घी स्वीट्स, शर्मा डेअरी अँड फास्ट फूड, पंजाबी चंदू हलवाई एलएलपी, श्री नारायण डेअरी आणि गुलशन डेअरी फार्म, त्रिभुवन डेअरी फार्म, महावीर काजू अँड फूड्स आणि अग्रवाल स्वीट मार्ट अशा एकूण नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

बर्फी, खवा जप्त

अंधेरी पूर्वेतील आयुष मिल्क सप्लायर येथे तपासणीदरम्यान स्वीट बर्फी आणि लो-फॅट पनीर आढळले. या अन्नपदार्थांचा एकूण २३ किलो साठा असून त्याची किंमत ६ हजार ४४० रुपये आहे. अन्नपदार्थांची अयोग्य पद्धतीने साठवणूक तसेच अपुरे व अयोग्य लेबलिंग आढळले. त्यामुळे हा साठा जप्त करून नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.

Mumbai FDA Action
Mumbai Beach Safety: मुंबईच्या ८ चौपाट्या ‘डेन्जर झोन’मध्येच! गिरगाव-जुहू वगळता कुठे आहे धोका?

मुलुंड पश्चिमेतील ब्रिजवासी मिठाईयां येथून खव्याचा नमुना घेण्यात आला. उर्वरित २२५ किलो खवा, किंमत ६० हजार ३०० रुपये, जप्त करण्यात आला. कांजूरमार्ग पूर्वेतील कृष्णा स्वीट्स अँड स्नॅक्स येथे आढळलेल्या त्रुटींप्रकरणी आस्थापनेला २० हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

प्रसादाबाबत गणेश मंडळांना मार्गदर्शन

गणेशोत्सवात मंडळांकडून भाविकांना वितरित होणारा प्रसाद व महाप्रसाद सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने तयार केला जावा, यासाठी एफडीएकडून मुंबईतील गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी पाच जनजागृती कार्यशाळा घेण्यात आल्या.

‘कॅफे मोंडेगर’चा परवाना निलंबित

कुलाब्यातील मेट्रो हाऊस येथील कॅफे मोंडेगरची १२ सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली. यावेळी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळल्या. गरम अन्नपदार्थांचे तापमान आवश्यक असलेल्या ६० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राखले जात नव्हते. तसेच शीतसाठवणुकीचे तापमान पाच अंश सेल्सिअसपेक्षा कमी राखले जात नसल्याचे आढळले.

अन्नपदार्थांचे अयोग्य पद्धतीने डीफ्रॉस्टिंग करणे, शिजविलेल्या पदार्थांचे आवश्यकतेनुसार जलद थंडकरण न करणे, फरशीचे ओलाव्यामुळे नुकसान होणे, अन्न तयार करण्याच्या ठिकाणाजवळील निचरा व्यवस्था अयोग्य असणे आणि त्यामुळे दूषित घटकांचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होणे, तसेच उपकरणांची योग्य स्वच्छता व निर्जंतुकीकरण न होणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला.

ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. मुदतबाह्य किंवा फेरफार केलेल्या अन्नपदार्थांची विक्री अथवा साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील.

- तुकाराम मुंढे आयुक्त - अन्न व औषध प्रशासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news