Mumbai Ganeshotsav facilities pudhari photo
मुंबई

Mumbai Ganeshotsav facilities : गणेशोत्सवात पिण्याचे पाणी व मोबाईल शौचालय

मुंबईत गणेश दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांना महापालिका उपक्रमाचा मिळणार दिलासा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात प्रख्यात गणोशोत्सव मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागतात, भाविक गर्दी करतात. त्या ठिकाणी भक्तांची पिण्याच्या पाण्याची व शौचालय सुविधेची गैरसोय होत असते.

यावर तोडगा काढताना सर्वाधिक गर्दी होणाऱ्या ठिकाणी मुंबई महापालिकेतर्फे पिण्याच्या पाण्यासह मोबाईल शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या मुंबईसह राज्य व परराज्यातून येणाऱ्या लाखो भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील गणेशोत्सव हा जगभरात प्रसिद्ध असून बाप्पाच्या दर्शनासह दरवर्षी लाखो भाविक लालबागच्या राजासह विविध गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या बाप्पांच्या दर्शनासह देखाव्याचा आनंद घेतात.

मुंबई लालबाग, परळ, गिरगाव या भागात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या भागातील लालबागच्या राजासह गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, तेजूकाया, नरेपार्क, लाल मैदान, लक्ष्मी कॉटेज, रंगारी बदक चाळ, खेतवाडी आदी गणेशोत्सवांना आवर्जून भाविक भेट देतात.

महापालिका विभाग कार्यालयांवर जबाबदारी

गणेशोत्सव काळात त्या त्या विभागात पिण्याचे पाणी व शौचालय पुरवण्याची जबाबदारी पालिकेच्या विभाग कार्यालयांवर सोपवण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात होणाऱ्या गर्दीचा आढावा घेऊन ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

नाक्यानाक्यावर पाणी भेटणार

  • बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे २०२५ मध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आजूबाजूच्या परिसरात पिण्याच्या पाण्यासह शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती.

  • परंतु ही व्यवस्था येणाऱ्या भक्तांसाठी कमी पडली. त्यामुळे यंदा या व्यवस्थेत वाढ करण्यासह त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. यासाठी पुढे मोबाईल शौचालयासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाक्या-नाक्यावर करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना बंद बाटलीतले महागडे पाणी घेण्याची गरज भासणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT