11th Admission 2026 pudhari photo
मुंबई

11th Admission 2026 : अकरावीच्या जागा मुंबईत घटल्या, ठाणे, रायगडमध्ये मात्र वाढल्या!

गेल्या काही वर्षांत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आणि 1 लाख 68 हजार जागा रिक्त राहत असल्याने अनेक महाविद्यालयांनी अकरावीच्या तुकड्या बंद केल्याचे समोर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पवन होन्याळकर

मुंबई विभागातील अकरावी प्रवेशासाठी यंदा एकूण जागांमध्ये फारसा बदल नसला, तरी मुंबई शहर व उपनगरांतील महाविद्यालयांत अकरावीला प्रवेशच न झाल्याने 1 हजार 430 जागा कमी झाल्या आहेत. मात्र ठाणे जिल्ह्यात यंदा तब्बल 1 हजार 120 जागांची वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आणि 1 लाख 68 हजार जागा रिक्त राहत असल्याने अनेक महाविद्यालयांनी अकरावीच्या तुकड्या बंद केल्याचे समोर आले आहे.

मुंबई विभागातील अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी यंदाच्या 2026-27 या शैक्षणिक वर्षात तब्बल 1 हजार 300 महाविद्यालयातून 4 लाख 76 हजार 250 जागा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 3 महाविद्यालये कमी झाली आहेत तर 60 जागांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या विभागात 4 लाख 76 हजार 190 जागा होत्या. यंदा मुंबई शहर व उपनगरांत मात्र 1 हजार 430 जागांची घट झाली.

येथे 1 लाख 99 हजार 70 जागा उपलब्ध आहेत. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात 1 हजार 120 जागांची वाढ झाली आहे. एकूण जागा 1 लाख 60 हजार 840 वर पोहोचल्या आहेत. रायगडमध्ये 340, तर पालघरमध्ये 30 जागांची वाढ झाली आहे. यंदा एकूण जागांमध्ये फारसा बदल झालेला नसला, तरी कमी प्रतिसादाचा फटका काही महाविद्यालयांना बसल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची वाढती पसंती लक्षात घेऊन काही महाविद्यालयांनी तुकड्या वाढवल्या आहेत, तर गेल्या वर्षी प्रवेश न झाल्याने काही महाविद्यालयांनी तुकड्या बंद केल्या आहेत.

गतवर्षी उपलब्ध असलेल्या 4 लाख 76 हजार 190 जागांपैकी केवळ 3 लाख 7 हजार 648 जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते तर तब्बल 1 लाख 68 हजार 542 जागा रिकामी राहिल्या होत्या. सर्वाधिक रिक्त जागा मुंबई शहर व उपनगरातील महाविद्यालयात होत्या.मुंबई शहर व उपनरातील 2 लाख 500 जागांपैकी 1 लाख 38 हजार 434 प्रवेश झाले, तर 62 हजार 66 जागा रिक्त राहिल्या.

ठाणे जिल्ह्यात 1 लाख 59 हजार 720 जागांपैकी 1 लाख 203 प्रवेश झाले होते, 59 हजार 517 जागा रिकामी राहिल्या होत्या. पालघरमध्ये 66 हजार 590 जागांपैकी 27 हजार 926, तर रायगडमध्ये 49 हजार 380 जागांपैकी 19 हजार 33 जागा रिक्त राहिल्या. यंदा मुंबईत अकरावीच्या जागा घटल्या आणि ठाणे रायगडमध्ये मात्र वाढल्या. या परिस्थितीला तीन कारणे आहेत, असे म्हटले जाते.

1. जागा रिकामी राहतात.

अकरावी प्रवेशासाठी स्वयंअर्थसहाय्याच्या नावाने विनाअनुदानित महाविद्यालयांना दरवर्षी नव्याने मान्यता दिली जाते.बहुतांश तुकड्यांत विद्यार्थीच प्रवेशासाठी फिरकत नसल्याने रिक्त राहणाऱ्या जागांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. नवीन महाविद्यालयांना परवानगी देताना जिथे गरज आहे तिथेच जागा वाढवल्या पाहिजेत. मात्र तसे न करता सरसकट महाविद्यालयांना मान्यता देवून जागा वाढवण्याचे सत्रच गेल्या काही वर्षापासून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिकामी राहत आहेत. स्वयंअर्थसहाय्यमधून मान्यता देते त्यामुळे सरकारला अनुदान द्यावे लागत नाही. मात्र त्या शाळांत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना फी द्यावी लागते. त्यामुळे याचा विचार शालेय शिक्षण विभागाने करायला हवा अशी मागणी पालकांची आहे.

2. पडताळणी का नाही?

अनेक महाविद्यालयांमध्ये वर्षानुवर्षे तुकड्या रिक्त राहत असतानाही त्यांची प्रभावी पडताळणी होत नसल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्ष प्रवेशसंख्या, विद्यार्थ्यांची मागणी आणि महाविद्यालयांची गुणवत्ता तपासल्याशिवाय नव्या तुकड्यांना मान्यता दिली जात असल्याने जागांचा असमतोल वाढत आहे. रिक्त राहणाऱ्या तुकड्यांचे पुनर्मूल्यांकन करून गरज नसलेल्या जागा कमी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.दुय्यम दर्जाच्या महाविद्यालयातील तुकड्या दरवर्षी रिकामीच असतात अशा महाविद्यालयांसाठी धोरण तयार करण्याची गरज आहे.

3. कला शाखेला गतवर्षी फटका

कला शाखेतील 74 हजार 595 जागांपैकी तब्बल 36 हजार 986 जागा रिक्त राहिल्या, म्हणजे जवळपास निम्म्याच जागांवर प्रवेश झाले. वाणिज्य शाखेत संख्येने सर्वाधिक 79 हजार 79 जागा रिक्त राहिल्या असल्या, तरी उपलब्ध जागांची संख्या अधिक असल्याने त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. विज्ञान शाखेतही 52 हजार 477 जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्याकडे अधिक असून, कला शाखेकडे ओढा घटत असल्याचे चित्र गतवर्षी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT