

मुंबई ः फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय)ने मानक न पाळणार्या तब्बल 89 संस्थांना प्रवेश प्रक्रियेबाहेर ठेवले. या कारवाईसोबतच रिक्त जागांमुळे राज्यभरातील संस्थांची संख्या कमी झाली असून यंदा उपलब्ध जागांमध्ये थेट घट झाली आहे. बी. फार्म आणि डी. फार्म अशा दोन्ही अभ्यासक्रमांमधील एकत्रित 92 संस्था आणि तब्बल 3 हजार 247 जागा कमी झाल्या आहेत. नोंदणी केलेले विद्यार्थी अधिक असून जागा कमी झाल्याने स्पर्धा चुरशीची होणार असली, तरी उशिरा प्रवेशाचा फटका बसल्याने यंदाही रिक्त जागा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत फार्मसी अभ्यासक्रमात संस्थांची भरमसाट वाढ झाली होती. कोरोना काळात वाढलेल्या मागणीमुळे अनेक महाविद्यालयांनी पीसीआयकडे परवानगी मागितली. तीन वर्षांत डी.फार्मसाठी 220 आणि बी.फार्मसाठी 92 अशा नव्या महाविद्यालयांना परवानगी मिळाली. पण अलीकडील तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या. अनेक संस्थांकडे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नव्हते, भोगवटा प्रमाणपत्र अपुरी होती, प्रयोगशाळा व कर्मचार्यांची कमतरता होती. या त्रुटींमुळेच पीसीआयने यंदा 89 संस्थांना प्रवेश प्रक्रियेबाहेर ठेवत जागा थेट या महाविद्यालयातील यंदा जागा कमी केल्या आहेत.
यंदा डी. फार्म (पदविका) अभ्यासक्रमासाठी 35 हजार 535 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. 607 संस्थांमध्ये एकूण 37 हजार 895 जागा उपलब्ध असून पहिली प्रवेश यादी 7 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. तर बी.फार्म (पदवी) अभ्यासक्रमासाठी तब्बल 52 हजार 466 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. 501 संस्थांमधील 40 हजार 710 जागा असून पहिली यादी 3 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.
गेल्या वर्षी राज्यात बी. फार्मसाठी 515 संस्थांत 41 हजार 282 जागा उपलब्ध होत्या, तर डी. फार्मसाठी 685 संस्थांमध्ये तब्बल 40 हजार 570 जागा होत्या. मात्र यंदा पीसीआयच्या कारवाईमुळे बी. फार्ममध्ये संस्थांची संख्या 501 पर्यंत आहे. तर जागा 572 ने कमी होऊन 40 हजार 710 इतक्या आहेत. डी.फार्ममध्येही संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. 78 संस्थांची घट झाली आहे. यंदा 607 संस्थामध्ये 37 हजार 895 इतक्याच जागा आहेत. म्हणजेच एकत्रित पाहता यंदा फार्मसी अभ्यासक्रमात जवळपास 3 हजार 250 जागांची घट झाली आहे.
गेल्या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत मात्र मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या होत्या. बी. फार्ममध्ये 515 संस्थांत 41 हजार 282 जागा उपलब्ध होत्या, परंतु त्यापैकी तब्बल 12 हजार 714 जागा रिकाम्या होत्या. डी. फार्ममध्ये 685 संस्थांत 40 हजार 570 जागा असूनही 12 हजार 404 जागा रिकाम्या होत्या. म्हणजेच दोन अभ्यासक्रम मिळून जवळपास 25 हजार जागा रिकाम्या राहिल्या होत्या. त्यामुळेच यंदा जागांची संख्या घटल्या तरी उशिरा प्रवेश होत असल्यामुळे किती विद्यार्थी प्रवेश घेतात हे पहावे लागणार आहे. कारण यंदा उपलब्ध जागापेक्षा प्रवेश घेण्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
बी. फार्मसाठी 52 हजार 466 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर जागा फक्त 40 हजार 710 आहेत, म्हणजे 11 हजार 756 विद्यार्थी अधिक आहेत. त्याचप्रमाणे डी. फार्मसाठी 35 हजार 535 विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून उपलब्ध जागा 37 हजार 895 आहेत, त्यामुळे या पदविका अभ्यासक्रमात तुलनेने जागा शिल्लक जागा राहण्याची शक्यता आहे.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही फार्मसी संस्थांच्या मान्यतेची प्रक्रिया सप्टेंबरअखेर पूर्ण झाली. मान्यता प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत लांबल्याने अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना सुमारे चार महिने प्रवेशासाठी थांबावे लागले. मान्यता न झाल्याने तंत्रशिक्षण संचालनालय आणि सीईटी सेलला प्रवेश सुरू करता आले नव्हते. अखेर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
डी.फार्मची पहिली यादी 7 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, बी.फार्मची पहिली यादी 3 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर प्रवेशाच्या चार फेरी होणार आहेत.