मुंबई: मुंबई शहरात ऐतिहासिक गडकिल्ले मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु या किल्ल्यांची फारशी माहिती पर्यटकांना नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या गडकिल्ल्यांचे कॉफीटेबल बुक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच किल्ल्यांचा सविस्तर अभ्यास करून पर्यटकांसाठी हे बुक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबई शहरात माहीम, वरळी, माझगाव, वांद्रे, सायन, धारावी काळा किल्ला, फोर्ट, शिवडी आदी गडकिल्ले असून हे किल्ले मुंबई शहराच्या विकासामध्ये दडले गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अन्य किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यांची देशी-विदेशी पर्यटकांना फारशी माहिती नाही.
त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेऊन, या किल्ल्यांची माहिती पर्यटकांना उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या किल्ल्यांची माहिती जमा करण्यासाठी मुंबईतील किल्ल्यांची माहिती असलेल्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात ही माहिती जमा करून, कॉफी टेबल बुक तयार करण्यात येणार आहे.
एक कोटीची तरतूद
कॉफी टेबल बुक बनवण्यासाठी सध्या स्थायी समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. हा निधी कमी पडल्यास त्यात वाढ करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.