Mumbai Fishing Boat Fire Pudhari
मुंबई

Mumbai Fishing Boat Fire: मुंबईच्या समुद्रात ‘सी प्रिन्सेस’ मासेमारी नौकेला भीषण आग; नौकेचे 40 लाखांहून अधिक नुकसान

एक खलाशी 40 टक्के भाजला; सहा जणांची सुखरूप सुटका, नौकेचे 40 लाखांहून अधिक नुकसान

पुढारी वृत्तसेवा

मालाड : मुंबईच्या खोल समुद्रात मासेमारी करत असताना ‌‘सी प्रिन्सेस‌’ या मासेमारी नौकेला रविवारी सकाळी अचानक आग लागली. या दुर्घटनेत नौकेवरील 7 खलाशांपैकी कुलदीप नामक 19 वर्षीय खलाशी जवळपास 40 टक्के भाजला असून कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर, उर्वरित 6 खलाशांना जवळच असलेल्या दुसऱ्या नौकेने सुरक्षितपणे बाहेर काढले असून ते सर्व सुखरूप असल्याची माहिती भाटी कोळीवाडा ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर कोळी यांनी दिली. स्टोव्ह अथवा गॅसचा भडका उडाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

भाटी कोळीवाडा येथील भाटी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेडच्या महिला सभासद रेश्मा मोझेस धाके यांच्या मालकीची ही नौका आहे. सकाळी सुमारे 10.15 वाजण्याच्या सुमारास नौकेला आग लागल्याची माहिती मिळताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ मुंबई कोस्ट गार्ड, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (मुंबई उपनगर) आणि येलो गेट पोलीस ठाणे यांना कळवले. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाने जलद मदतीसाठी नौसेना अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच मढ दर्यादीप मच्छिमार सहकारी संस्थेचे सचिव स्वप्निल कोळी यांनी वायरलेसद्वारे कोस्ट गार्ड आणि नौसेनेशी संपर्क साधला.=

मदत पोहोचण्यास झाला उशीर

नौसेनेचे जहाज वेळेत घटनास्थळी पोहोचले, मात्र केवळ पाहणी करून ते तेथून निघून गेल्याची माहिती संस्थेचे सचिव शैलेश कोळी यांनी दिली. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने मदत पोहोचेपर्यंत नौकेच्या नाळीपर्यंत (समोरील भागापर्यंत) आगीने विळखा घातला होता. या दुर्घटनेत नौकेवरील एका खलाशाच्या दोन्ही पायांना व एका हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला ‌‘सागर कन्या‌’ या नौकेच्या मदतीने किनाऱ्यावर आणून कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

40 लाखांहून अधिकचे नुकसान

या आगीत नौका मालक रेश्मा मोझेस धाके यांचे अंदाजे 40 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT