मुंबई

Mumbai Fire News: विक्रोळीत खळबळ! डबल मर्डर प्रकरणातील सील केलेल्या घराला लागली भीषण आग; गॅस सिलिंडरचा स्फोट

पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विक्रोळीच्या पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीतील राहुल नगर येथील अशोक सम्राट बिल्डिंगजवळ असलेल्या विश्वकर्मा कुटुंबाच्या घराला सोमवारी (दि. १०) पहाटे भीषण आग लागली. विशेष म्हणजे, ज्या घरात काही दिवसांपूर्वीच दोन हत्या झाल्या होत्या आणि जे पोलीस तपासासाठी सील केले होते, त्याच घराला आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

काय आहे नेमकी घटना?

पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीतील राहुल नगर, अशोक सम्राट बिल्डिंग जवळील सुरेंद्र विश्वकर्मा व इतर यांच्या झोपडीला आज पहाटे ०४:५० वाजता अचानक आग लागली. नमूद झोपडी ही पार्कसाईट पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४२/२६, कलम १०३ (१), १०९ (१), ११५ (२), ३५२, ३ (५) बीएनएस (BNS) या गंभीर गुन्ह्याचे अधिकृत घटनास्थळ आहे. गत गुरुवारी शुल्लक कारणावरून सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा यांची याच घरात त्यांच्या दोन भावांनी हत्या केली होती. या गंभीर गुन्ह्यानंतर पोलिसांनी हे घर चौकशीसाठी सील केले होते. मात्र, आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास याच सील केलेल्या घराला अचानक भीषण आग लागली. या आगीच्या दरम्यान घरातील गॅस सिलिंडरचा स्फोटही झाल्याची माहिती समोर आली आहे.

अग्निशामक दल व पोलिसांची तत्परता

आगीची भीषणता पाहता घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ०६ गाड्या आणि पोलीस पथք तात्काळ दाखल झाले. पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या रात्रपाळीवरील कर्तव्यरत अधिकारी व अंमलदारांच्या मदतीने तातडीने आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला, ज्यामुळे आजूबाजूच्या वस्तीत आग पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दल आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ०७:१५ वाजता आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. या दुर्घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.

संशयाचा धूर आणि पोलिसांचा तपास

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच डबल मर्डर झालेल्या आणि पोलिसांनी सील केलेल्या घराला अचानक आग लागल्याने हा एक योगायोग आहे की पूर्वनियोजित घातपात, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT