

मुंबई : ग्रॅण्ट रोड येथील पेडर रोड परिसरात असलेल्या सहा मजली सुखशांती इमारतीत सोमवारी सकाळी पावणे आठव्या सुमारास भीषण आग लागली. या इमारतीत असलेले प्रसिद्ध कपड्यांचे दुकान ‘लिबास’ आगीच्या भक्ष्यस्थानी आले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, वरच्या मजल्यांवर अडकलेल्या 8 जणांसह, तीन श्वान आणि दोन मांजरीची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले.
मुंबईत आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात वांद्रे येथील शोरूमला लागलेल्या आगीनंतर पुन्हा दुसर्या आठवड्यातील पहिल्याच सोमवारी सकाळी ग्रॅण्ट रोड येथील पेडर रोड या उच्चभ्रू परिसरातील एका सहा मजली इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. यावेळी अग्निशमन जवानांनी पहिल्या मजल्यावरून चार पुरुष आणि चौथ्या मजल्यावरून चार महिला, तीन कुत्रे व दोन मांजरींना सुरक्षितपणे बाहेर काढले.
सदर आग शोरूममधील विद्युत यंत्रणा, विद्युत उपकरणे आणि कपड्यांना लागली होती. आगीमुळे संपूर्ण इमारतीत धूर पसरला होता. या आगीत शोरूममधील महागडे कपडे जळून खाक झाले आहेत. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी बेस्ट विद्युत विभाग, पोलीस, 108 रुग्णवाहिका सेवा यांच्यासह अग्निशमन दलाचे विविध अधिकारी आणि गाड्या दाखल झाल्या होत्या.
सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास अग्निशमन जवानांना आगीवर चारही बाजूंनी नियंत्रण मिळवण्यात यश आले, तोपर्यंत अग्निशमन दलाच्या वतीने वर्दी 2 ची आग घोषित करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.