FDA Action on Spice Sellers AI Image
मुंबई

FDA Action on Spice Sellers : मुंबई, ठाण्यात मसाले विकणाऱ्या १३ आस्थापनांचे परवाने निलंबित

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; एफडीएची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भेसळयुक्त मसाल्यांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महामुंबईत कारवाईचा धडाका लावला आहे. याअंतर्गत १ एप्रिल ते २९ ऑक्टोबरदरम्यान बृहन्मुंबईतील मसाले व मसालेजन्य पदार्थांच्या १२३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५४ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून, १० आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ येथील तीन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये मुंबई सेंट्रल येथील हिंदुस्तान मसाला ग्राइंडिंग मिल्स, सांताक्रूझ पूर्व येथील गूसबम्प्स पिकल्स, अंधेरी पश्चिम येथील न्यू बॉम्बे मसाला शॉप आणि राठोड मसाला शॉप, वांद्रे पश्चिम येथील जॅफसन, सांताक्रूझ पश्चिम येथील श्री गजानन मसाला स्टोअर्स, घाटकोपर पूर्व येथील सी. एम. मसाला, मुलुंड पश्चिम येथील ठक्कर ट्रेडर्स, दहिसर पूर्व येथील पूर्विन इंडस्ट्रीज आणि भांडुप पश्चिम येथील अनंता फूड प्रॉडक्ट, कल्याणमधील राय फेमस मसाला आणि अंबिया मसाला, तसेच अंबरनाथमधील करवळेकर मसाले यांचा समावेश आहे.

राज्यभरात मसाले व मसालेजन्य पदार्थांच्या तपासणीसाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत १ एप्रिल ते २९ ऑक्टोबरदरम्यान १,०५७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ८४ परवाने निलंबित करण्यात आले असून, सुमारे १९ कोटी ७० लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. विभागनिहाय आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक २७ परवाने निलंबित करण्यात आले. पुणे आणि अमरावती विभागांत प्रत्येकी १४, नाशिकमध्ये आठ आणि नागपूरमध्ये सात परवाने निलंबित झाले.

सात दिवसांत १३.६० कोटींचा साठा जप्त

१५ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अनुपालन आदेशानंतर २३ ते २९ ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. या सात दिवसांत ४७२ तपासण्या करून ७८३ नमुने घेण्यात आले. या मोहिमेत ७२ परवाने निलंबित करण्यात आले, तर १,३६० लाख रुपये म्हणजेच १३.६० कोटी रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. एप्रिलपासून आतापर्यंतच्या एकूण जप्तीच्या मूल्यापैकी सुमारे ६९ टक्के जप्ती या सात दिवसांत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT