Mumbai Crime News pudhari photo
मुंबई

Mumbai Crime : दोन-अडीच हजारांमध्ये बोगस शासकीय दस्तऐवज बनविणार्‍या चौघांना अटक

कांदिवलीतील आधारकार्ड सेंटरमध्येच बनविले जात होते बोगस दस्तऐवज

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दोन ते अडीच हजारामध्ये गरजू लोकांना बोगस शासकीय दस्तावेज बनविणार्‍या एका टोळीशी संबंधित सुरजकुमार रामचंद्र यादव, उपेंद्र कप्तान सिंग, सत्यम ललन मिश्राआणि आकाश भगवान पटवा या चार आरोपींना दहिसर आणि कांदिवली येथून दहिसर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर चारही आरोपींना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही टोळी कांदिवलीतील दोन आधारकार्ड सेंटरमध्ये बोगस आधारकार्ड, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्डसह इतर शासकीय दस्तावेज बनवून देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या टाेळीचा छडा लावण्यसाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाला पाठविले होते.

या ग्राहकाने आधारकार्ड अर्ज केल्यानंतर त्याला कांदिवलीतील एका आधारकार्ड सेंटरमध्ये नेण्यात आले होते. तिथेच त्याला अडीच हजारामध्ये एक बोगस आधारकार्ड देण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक मारुती सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय निलेश साळुंके, पोलीस अंमलदार आत्माराम भलकारे, संतोष भागवत, सुनिल राठोड, संतोष गावडे आदी पोलीस पथकाने दहिसर येथील बालाजीनगर, युएस इंटरप्रायजेस आणि कांदिवलीतील हनुमाननगर, सॅम इनफोटेक आधार सेंटरमध्ये कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी सुरजकुमार आणि उपेंद्र या दोघांना अटक केली.

घटनास्थळाहून पोलिसांनी ३२ बोगस जन्मदाखला, सरदार वल्लभभाई पटेल शाळा आणि पायोनिअर कॉलेज ऑफ आर्टस ऍण्ड कॉमर्स महाविद्यालयाच्या मुख्याधापक व प्राचार्य यांचे सही शिक्का असलेले कोरे प्रमाणपत्र, बोटाचे फिंगरप्रिट ठसे असलेले दोन शिक्के आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यांत उमेश राजेश यादव ऊर्फ समीर याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.

ही कारवाई ताजी असताना या पथकाने कांदिवलीतील पोईसर परिसरात असलेल्या शिवम इंटरप्रायजेसमध्ये कारवाई केली होती. या ठिकाणाहून पोलिसांनी सत्यम मिश्रा आणि आकाश पटवा या दोघांना अटक केली. ते दोघेही तिथे बोगस जन्मदाखला तसेच इतर शासकीय बोगस दस्तावेज बनवून देत असल्याचे उघडकीस आले.

घटनास्थळाहून पोलिसांनी १४ बोगस जन्मदाखला, ७ रहिवाशी दाखला, २६ एसबीआय मेडीकल पॉलिसी, तीन नागरित्व दाखल्याची प्रती, प्रत्येकी दोन संगणक, सीपीयू, किबोर्ड, माऊस, प्रिंटर, भारत शासनाची आधार अपडेट मशिन, आयरिस स्कॅनर, फिंगरप्रिंट स्कॅनर, वेबकॅमेरा आदी मुद्देमाल जप्त केला आहे. ही टोळी गेल्या एक वर्षांपासून अनेकांना बोगस दस्तावेज बनवून देत होते. दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी शंभरहून अधिक बोगस दस्तावेज विक्री केल्याचे पुरावे सापडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT