मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत आपत्कालीन दुर्घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सन २०२० पासून सप्टेंबर २०२६ पर्यंतच्या सुमारे साडेसहा वर्षांच्या कालावधीत मुंबईत विविध आपत्कालीन दुर्घटनांमध्ये एकूण ७२० नागरिकांचा मृत्यू झाला असून, २,४०८ नागरिक जखमी झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
शकील अहमद शेख यांनी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे २०२० ते २०२६ या कालावधीत घडलेल्या आपत्कालीन दुर्घटनांची संख्या, त्यामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या आणि जखमींची संख्या याबाबत माहिती मागविली होती.
त्यावर महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकारी सुनील जाधव यांनी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत ही माहिती उपलब्ध करून दिली.
शकील अहमद शेख यांच्या म्हणण्यानुसार, समुद्र, नाले, नद्या, विहिरी, खाड्या, खाणी आणि मॅनहोलमध्ये पडून ३२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३७ पुरुष आणि ९१ महिलांचा समावेश आहे. या आकडेवारीमुळे मुंबईतील सार्वजनिक सुरक्षितता, उघडे मॅनहोल, नाल्यांच्या परिसरातील संभाव्य धोके आणि जलस्रोतांच्या आसपासच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची?
उघडे मॅनहोल, धोकादायक नाले, असुरक्षित इमारती आणि आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत वेळेत खबरदारी घेतली जाते का? दुर्घटना घडल्यानंतर मदत करण्याबरोबरच दुर्घटना घडू नयेत यासाठी किती प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर शकील अहमद शेख यांनी महापालिका आयुक्त आणि मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपत्कालीन दुर्घटना रोखण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
यक ठिकाणांची नियमित तपासणी, उघड्या मॅनहोल व नाल्यांवर सुरक्षित उपाययोजना, इमारतींच्या सुरक्षिततेची तपासणी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.
कोणत्या दुर्घटनांमध्ये किती जीवितहानी?
झाडे व झाडांच्या फांद्या पडणे : २२ मृत्यू, ३०६ जखमी.
दरड कोसळणे : ३९ मृत्यू, ३३ जखमी.
घरे, भिंती आणि इमारतींचे भाग कोसळणे : १७९ मृत्यू, ८६४ जखमी.*
आग व शॉर्टसर्किट : १६८ मृत्यू, १,०४८ जखमी.
समुद्रात किंवा विहिरीत पडणे : १९५ मृत्यू, ४४ जखमी.
मॅनहोल किंवा नाल्यात पडणे : ५६ मृत्यू, ७७ जखमी.
वीजप्रवाहाचा धक्का लागणे : ४० मृत्यू, ५७ जखमी.