मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू आहे. राज्यात केलेल्या कारवाईत एकूण 3 कोटी 10 लाख 17 हजार 20 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर मुंबईत 44 कोटी 95 लाख 7 हजार 237 रुपयांचे 55 ग्रॅम ब्राउन शुगर, चरस गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली.
दरम्यान, देशी कट्टा, दारुगोळा सह 203 धारधार शस्त्र जप्त करण्यात आली असून 29 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे गगराणी यांनी सांगितले.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा 15 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने केली आणि त्याच दिवशी संध्याकाळपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली. निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर
कारवाईसाठी फ्लाईंग स्कॉट, भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच निवडणूक काळात आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील 29 महानगरपालिका क्षेत्रांत करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, अमली पदार्थांचा साठा, शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
रोख : 3 कोटी 10 लाख 27 हजार 20 रुपये
मद्य : 1,237 लिटर (किंमत 8 लाख 3 हजार 330 रुपये)
जाहिरात फलक : 7,651
बेकायदा झेंडे : 1,601