मुंबई : मुंबईतील मतदार यादीतील अजून एक घोळ उघडकीस आला असून 4 लाख 33 हजार मतदारांची नावे 11 लाख 1 हजार 505 ठिकाणी नोंद करण्यात आली आहेत. यात दोनपेक्षा जास्त व 103 वेळा नोंद झालेल्या मतदारांची संख्याही मोठी असल्याची धक्कादायक माहिती मुंबई महापालिका निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यामुळे हे मतदार दोन ते तीन वेळा मतदान करणार नाहीत याची काळजी घेताना निवडणूक विभागाचा मोठी कस लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेला एकाच मतदाराची अनेक ठिकाणी नाव नोंद असल्याची यादी मिळाली आहे. यात अनेक मतदारांची नावे मुंबईतील विविध प्रभागांमधील मतदार यादीमध्ये नोंद आहेत.
केवळ एका मतदाराचे नाव दोन वेळाच नाही तर, 10 वेळा, 15 वेळा, 40 वेळा, 50 वेळा, 70 वेळा, 90 वेळा, 103 वेळा नोंद करण्यात आले आहे. अशा मतदारांची संख्या 4 लाख 33 हजार असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या मतदारांना दोन वेळा मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. दुबार नाव असलेल्या मतदारांकडून परिशिष्ट एक भरून, नेमके आपण मतदान कुठे करणार याचे हमीपत्र घेण्यात येणार आहे. त्यामुळे असे आम्ही पत्र लिहून देणाऱ्या मतदारांचे नाव अनेक ठिकाणी आहे. अशा मतदार यादी मध्ये त्यांच्या नावासमोर चिन्हांकित केले जाणार आहे.
परिशिष्ट एक न भरणाऱ्या मतदारांकडून मतदानादिवशी परिशिष्ट दोन भरून आपण एकाच ठिकाणी मतदान केल्याचे हमीपत्र घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुबार मतदानाचा प्रश्न निकाली निघू शकतो. पण ही दुबार नावे मतदार यादीतून काढून टाकण्याचा सर्वस्वी अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले.
नावातील चुका सुधारता येणार
मतदार यादीमध्ये चुकीचे नाव असेल तर, पूर्वीप्रमाणे मतदारांना अ व ब असा फॉर्म भरावा लागणार नाही. मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मतदार यादी दुरुस्तीसाठी विशेष कक्ष सुरू केला आहे. या कक्षात जाऊन मतदारांनी आपले नाव चुकीचे आहे असे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते नाव तेथेच दुरुस्त करण्यात येईल. यासाठी मतदाराला आपले आधार कार्ड अथवा अन्य ओळखपत्र द्यावे लागणार आहे. ज्यांना प्रत्यक्ष जाऊन नावात सुधारणा करणे शक्य नसेल त्यांनी पूर्वीप्रमाणे अ व ब फॉर्म भरून देण्यात यावेत, असेही पालिकेकडून सांगण्यात आले.
1 जुलै 2025 ची यादी गृहीत धरणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची यादी गृहीत धरण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत ज्याचे नाव होते मात्र 1 जुलै 2025 च्या यादीत नाव नसेल अशांना पुरावा देऊन आपले नाव नोंदवता येईल. एका प्रभागातील मतदाराचे दुसऱ्या प्रभागात नाव नोंद झाले असेल, त्यांना आपल्या प्रभागातील मतदार यादीत नाव टाकता येईल. त्याशिवाय नावातील चुकाही सुधारता येतील.